नांदेड: इंडीया आघाडीमधील नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. म्हणून काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे. इंडीया अलायन्स देशात जवळपास २५ टक्के जागांवर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. ते एकमेकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करीत आहेत. ४ जून नंतर तर ते एकमेकांच्या कपडे फाडतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराेधकांवर हल्लाबोल केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील मामा चौकातील मोदी ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील पहिली सभा घेण्यात आली. सर्वांना माझा नमस्कार, २६ एप्रिलची तयारी झाली ना? असा सवाल करीत मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. पहिल्या टप्प्यातील मतदानोत्तर चाचणीत जनतेने एनडीएचा विजय पक्का केला आहे. लोकशाहीला ताकद देण्यासाठी सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. विरोधकांनीही जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचा पराभव निश्चित असला तरी, आज, उद्या, परवा कधी तरी संधी मिळेल म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. इंडीया अलायन्सकडे कोणताच चेहरा नाही. त्यामुळे हा देश कोणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत आहेत. अशा मंडळीवर जनतेने भराेसा कसा ठेवायचा? त्यांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही संसदेत आल्यानंतर गोंधळ घालतील.
काँग्रेसच्या साहिबजाद्यांना तर वायनाडमध्येही संकट दिसत आहे. त्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. काही दिवसापूर्वीच साहिबजाद्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. साथीदारांचेही हे हाल असतील तर कसे? त्यांना परंपरागत अमेठीतून बाहेर पडावे लागले, वायनाड सोडावे लागले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस परिवाराची पहिल्यांदाच अशी अवस्था झाली. काँग्रेस परिवार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ते स्वत: काँग्रेसला मतदान करु शकत नाहीत. कारण त्या ठिकाणी दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार आहे. त्यामुळे ४ जूननंतर इंडीया आघाडीचे नेते एकमेकांची नक्कीच कपडे फाडतील.
काँग्रेसने वंचित, शोषित, गरीब, शेतकरी यांच्या विकासात भिंत उभी केली आहे. आम्ही दहा वर्षात कोट्यवधी लोकांना घरे दिली, मोफत राशन दिले तर काँग्रेसवाले त्याची टर उडवित होते. गरीबांची बँक खाती काढली, युपीआय आणले तर या अशिक्षित लोकांना ते काय कळणार म्हणणाऱ्या काँग्रेसला मतदान करुन आपले मत वाया घालू नका असे आवाहनही मोदी यांनी केले. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार ही मोदी गॅरंटी आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेसचे खड्डे बुजविण्यात आले. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. असेही मोदी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
शंकररावांकडून शिकण्याचा प्रयत्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची भाषणात आठवण काढली. ते म्हणाले, मी राजकारणात नव्हतो, तेव्हा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता. त्यावेळी पट्टपुर्ती येथे साईबाबा यांनी शंकरराव चव्हाण यांची माझी ओळख करुन दिली. मला त्यांच्याशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीतील नम्रता बघून मी प्रभावित झालो. त्यांच्यापासून नेहमी शिकण्याचा मी प्रयत्न करतो असेही मोदी म्हणाले.