नांदेड- मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. तद्नंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले. ही घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे घडली.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान होत असताना हदगाव, माहूर, किनवट, देगलूर आदी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकारही उघडकीस आला.
दरम्यान, बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये मतदान असलेल्या भैय्यासाहेब आनंदराव एडके या तरुणाने मतदानासाठी मतदान केंद्रात प्रवेश केला. तद्नंतर सोबत आणलेली कुऱ्हाड काढून मतदान यंत्र फोडली. तरुणाच्या हातातील कुऱ्हाड पाहून भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मतदान प्रतिनिधींनी केंद्राबाहेर पळ काढला. वेळीच पोलिसांनी आरोपी भैय्यासाहेब एडके यास ताब्यात घेतले.
बेरोजगारीमुळे केले कृत्यआपण एम.ए.चे शिक्षण घेवून देखील बेरोजगार असून या सरकारमुळेच बेरोजगारी निर्माण झाल्याचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याचे सदर आरोपी भैय्यासाहेब एडके याने पोलिसांना सांगितले. सदर घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. तोपर्यंत एकूण ३७९ मतदानापैकी १८५ मतदारांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकारी सुबोध थोरात यांनी सांगितले.