मनाठा (नांदेड) : २० लाख रुपयांची मागणी करीत चाभरा येथिल माजी सरपंचाला हातपाय बांधून रात्रभर पोत्यात बांधून ठेवल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सरपंच पुंडलीक हरीचंद्र कपाले(५४) असे माजी सरपंचाचे नाव आहेत. त्यांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत थेट मनाठा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड येथील बिल्डरला खंडणीसाठी जीवे मारल्याच्या घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यानंतर जिल्ह्यात खंडणीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. खंडणीसाठी अपहरणाची अशीच एक खळबळजनक घटना चाभरा येथे घडली आहे. येथील माजी सरपंच पुंडलीक हरीचंद्र कपाले(५४) हे गुरुवारी रात्री जेवण करुन शेतामध्ये मुक्कामाला गेले होते. मध्यरात्री काहीजणांनी त्यांचे हातपाय बांधून पोत्यात टाकत शेतापासून दूर फरफटत नेले. सकाळी आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांची पोत्यातून सुटका केली.
कपाले यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, केशव विश्वासनाथ मगर (४२) आणि अन्य एकाने कपाले यांना बेदम मारहाण करत पोत्यात डांबून ठेवले. जीवे ,मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे २० लक्ष रुपयांची मागणी केली. कपाले यांनी ३ लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर आरोपीं त्यांना तसेच सोडून पळाले. याप्रकरणी कपाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी केशव विश्वासनाथ मगर (४२) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनी विनोद चव्हाण करीत आहेत.