तालुक्यात दि.१ ते १६ डिसेंबर या कालावधीत घरोघरी भेटी देऊन संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एकूण २ लाख १० हजार लोकसंख्या व ४० हजार ६४० कुटुंबांना २४५ आरोग्य पथक भेटी देत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ता. पर्यवेक्षक शेख शार्दूल, कुष्ठरोग तंत्रज्ञ इ.बी. पठाडे, क्षयरोग पर्यवेक्षक एस.ए. मुक्कनवार, सिंधूताई केसाळे यांच्या सूचनेनुसार आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी शोधमोहीम राबवीत आहेत. १ ते १० डिसेंबर या कालावधीत १ लाख ५५ हजार लोकसंख्येला व ३२ हजार ७८ कुटुंबाला पथकाने घरोघरी जाऊन भेटी दिल्या.
तालुक्यात बारूळ, उस्माननगर, पानशेवडी, कुरुळा व पेठवडज या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत कुष्ठरोगाचे २७० संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील २१० जणांची तपासणी केली असता ४ रुग्ण आढळले. पानशेवडी २ व पेठवडज अंतर्गत असलेल्या गावात २ रुग्णांचा समावेश आहे. क्षयरोगाचे संशयित २८३ पैकी २५८ जणांचे स्पुटन घेतले असता कुरुळा केंद्रांतर्गत गावात १ रुग्ण आढळला आहे. उर्वरित शोधमोहीम व शिल्लक संशयितांची तपासणी यातून आणखी किती कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णाचे निदान होईल हे १६ तारखेनंतर समोर येईल.
घरोघरी भेटी देऊन संयुक्त शोधमोहीम राबवीत आहेत. त्वचेवर फिकट-लालसर चट्टे असल्यास व त्याजागी घाम येत नसेल तर, त्वचेवर थंड व गरम संवेदना, तळहात-तळपायावर मुंग्या येणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, भुवयांचे केस विरळ होणे, जाड-बधिर-तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड आदी लक्षणे आढळल्यास संशयित म्हणून नोंद घेतली जात आहे. अशा संशयित रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.
क्षयरोगात वजनात लक्षणीय घट, सायंकाळी ताप, थुंकीतून रक्त पडणे व छातीत दुखणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक ताप, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला आदी लक्षणे असल्यास संशयित म्हणून नोंद केली जात आहे आणि त्यांचे स्पुटन गोळा केले जात आहे. थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जात असून, या रोगाचे निदान केले जात आहे.