अनुराग पोवळे।नांदेड : शहरानजिक असलेल्या पांगरीतर्फे असदवन येथून परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरूच आहे. याकडे स्थानिक महसूल यंत्रणेने मात्र दुर्लक्षच केले आहे.पांगरी येथे ग्रामीण दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या खदाणीतून रात्रंदिवस मुरुमाचे उत्खनन होत आहे. गौण खणिजाचे उत्खनन दिवसा करावे, असा नियम असला तरीही या नियमाचे सर्रास उल्लंघन करुन रात्रंदिवस या ठिकाणी मुरुमाचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. त्याचवेळी उत्खननासाठी जेसीबीचाही वापर केला जात आहे. या मुरुमाची वाहतूक गावातूनच रात्रंदिवस सुरू असल्याने स्थानिकांनी याबाबत तक्रार केली आहे.सदर ठिकाणचा ३०० ब्रास मुरुम उत्खननाचा परवाना नांदेड तहसील कार्यालयातून देण्यात आला होता. हा उत्खननाचा परवाना कालावधी संपल्यानंतरही उत्खनन सुरुच आहे. उत्नखननाच्या परवानगीनंतरही परवान्यापेक्षा कितीतरी पटीने येथे उत्खनन केले जात आहे. मोठ्या वाहनाने ही वाहतूक सुरू आहे.याकडे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. त्याचवेळी रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. उत्खनन होत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच ग्रामीण दंत वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस सुरू असलेल्या उत्खननाचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही केली आहे.
पांगरीत मुदत संपल्यानंतरही उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:42 AM
शहरानजिक असलेल्या पांगरीतर्फे असदवन येथून परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरूच आहे. याकडे स्थानिक महसूल यंत्रणेने मात्र दुर्लक्षच केले आहे.
ठळक मुद्देपरवानगी केवळ ३०० ब्र्रासची : उत्खनन हजारो ब्रासचे