नांदेड : जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने किनवट, माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक किनवट तालुक्यातील 6 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
जिल्ह्यात 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. रिमझीम पावसाने सूर्यदर्शनही नाही. रविवारी किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळी 8 वाजता झालेल्या एकूण नोंदित किनवट तालुक्यात बोधडी 65.50 मिमी, इस्लापुर 65.50, जलधारा 65.50, शिवणी 72, मांडवा 65.50 मिमी आणि दहेली मंडळात 65.50 मिमी पावसाची नोंद झाली.
भोकर तालुक्यातील मातूळ मंडळात 65.50 मिमी, हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात 67 मिमी आणि माहूर तालुक्यात सिंदखेड मंडळात 65.50 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 25.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मूग, उडिदाच्या शेंगाना पावसाने मोड फूटत आहेत. तसेच सोयाबीनची पानेही पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी आता चिंतित झाला आहे.