नांदेड : नांदेड ते मुंबई धावणाऱ्या तपोवन एक्सप्रेस या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये २३ मार्च रोजी सकाळी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अद्याप ओळख पटली नाही.
नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस (१७६१८) रेल्वे दररोज धावते. गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी ही रेल्वे प्लॅफॉर्मवर उभी होती. त्यावेळी रेल्वेच्या डी-८ या कोचमधील टॉयलेटमध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे, कर्मचारी कांचन राठोड, युवराज लव्हाळे, मनोज वानखेडे, किरण राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दुपारी दोन वाजेपर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही, याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.
तोंडातून होत होता रक्तस्त्रावमयत महिला ही ३० ते ३५ वर्ष वयोगटातील आहे. पोलिसांनी रेल्वे कोचच्या टॉयलेटमध्ये असलेल्या मृतदेहाचा पंचनामा केला, त्यावेळी महिलेच्या उजव्या गालावर खरचटलेले होते तसेच तोंडामधून रक्तस्त्राव येत होता. महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.