कार्यालयांच्या निर्मितीबरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वातावरणात काम करता आले पाहिजे. जेवढे अधिक चांगले वातावरण अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळेल तेवढ्या चांगल्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी आपले काम गुणवत्तेने पूर्ण करतील यावर माझा विश्वास आहे. काम करतांना झालेल्या चुका एकवेळेस समजून घेता येईल. कामात जर कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याबाबतही वेगळा विचार करावा लागेल, असे स्पष्ट करून चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्ते, पूल, इमारती यासारख्या विकासकामांमध्ये आरेखनापासून त्याच्या नियोजनापर्यंत लागणारा कालावधी हा कमी करायचा जर असेल तर हे कार्यालय आणि कार्यालयातील मनुष्यबळ वाढविण्याशिवाय पर्याय नाही. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांपासून शासनाच्या विविध प्रकल्पातील योजनांच्या कामाचा व्याप हा केवळ औरंगाबाद येथे एकच कार्यालय असल्याने त्यावर पडत होता. आता हा व्याप विभागाला जाऊन विकासकामांच्या आरेखन, संकल्पचित्राचे काम नांदेड येथे सुरू झाल्यामुळे हा होणारा विलंब टाळता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
विविध विकासकामांमधील गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा व जबाबदारीचा विषय असून त्यासाठी आवश्यक असणारा दक्षता व गुणनियंत्रण विभागही आता नांदेडमध्ये कार्यान्वित झाला आहे.
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे. शासकीय पातळीवरून अशा गुणवत्ताधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याकरिता महसूल दिनाच्या धर्तीवर अभियंता दिनही पुढच्या वर्षीपासून आपण साजरा करूअसे ते म्हणाले. यावेळी मुख्य अभियंता दिलीप उकिरडे व अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी आपल्या मनोगतात या नवीन कार्यालयाची रचना व महत्त्व विषद केले. कार्यक्रमास नवीन कार्यालयातील अभियंत्यांसह इतर विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर इतर वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.