नांदेड : शहरातील वजिराबाद भागातील कै. व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा विकास बीओटी तत्वावर करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर आता शहरातील महात्मा फुुले मंगल कार्यालयाचा बीओटी तत्वावर विकास केला जाणार आहे. या कामासाठीही महापालिकेने निविदा मागविल्या असून अपेक्षेपेक्षा खूपच कमी रक्कम मिळत असल्याने या निविदा पुन्हा मागविण्यात येतील काय? याकडे लक्ष लागले आहे.मनपाने शहरातील वजिराबाद भागातील कै. व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. या मार्केटचा बीओटी तत्वावर विकास केला जाणार आहे. त्याचवेळी महापालिकेलाही ५ कोटी ५१ लाख रुपयांसह ११ हजार ८०३ स्क्वेअर फूट बांधकाम मनपाला करुन दिले जाणार आहे. यातून महापालिकेला आहे त्या भाडेकरुंचे पुनर्वसन आणि पार्किंगची सुविधा करता येणार आहे. विशेष म्हणजे तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावरुन विकास करण्याच्या कामातून ३ कोटी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र अपेक्षेपेक्षा २ कोटींहून अधिक रक्कम महापालिकेला प्राप्त झाली आहे. तरोडेकर मार्केटच्या विकासाची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.त्याचवेळी आता महापालिकेने महात्मा फुले मंगल कार्यालयाचा विकासही बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर निविदा प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेत दुसऱ्यांदा मागविलेल्या निविदेत शारदा कन्स्ट्रक्शनने ९ कोटी २५ लाख तर सन्मान कन्स्ट्रक्शनने ८ कोटी ५० लाख रुपये महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे.विशेष महापालिकेला महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या बीओटी तत्वावरील विकासाच्या माध्यमातून तब्बल २५ कोटी रुपये प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे.प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेत ९ कोटी २५ लाखांची सर्वाधिक रक्कम देण्याची तयारी ठेकेदारांनी दर्शविली आहे. त्यामुळे आता या कामाच्या निविदेला मंजुरी द्यायची की नव्याने निविदा मागवायचा हा निर्णय महापालिकेला घेणार आहे. वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटच्या बीओटी तत्वावरील विकासातून अपेक्षेपेक्षा दोन कोटी रुपये रक्कम अधिक मिळाली आहे. असे असताना महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या विकासातून अपेक्षेपेक्षा निम्म्याहून कमी रक्कम मनपा प्रशासन स्वीकारेल का ? हाही प्रश्न पुढे आला आहे.
- मनपाने यापूर्वी शहरातील दिगंबरराव बिंदू मंगल कार्यालय, महापालिकेच्या मुख्य इमारतीचा बीओटी तत्वावर विकास केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा विकासाच्या मोबदल्यात जुन्या जकात नाका जागेवरील मार्केट महापालिकेला उभारुन देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसमोरील जागेवर सन्मान टॉवर मार्केटचे काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे.बीओटीतून शहराचा विकास साधण्यात येत आहे.