नांदेड : बाजारात अनोळखी पुरुषांशी काही निमित्त करुन ओळख करायची त्यानंतर मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना आपल्या घरी बोलावायचे. घरी आल्यानंतर आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून पुरुषाला निर्वस्त्र करती त्याचे व्हिडीओ तयार करायचे अन् ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळायची. असा फसवणूकीचा अजब फंडा वापरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे
सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून अनेकांना खंडणी मागितल्याचे अनेक प्रकरणे आहेत. परंतू त्यापुढे जाऊन नांदेडातील एका टोळीने थेट पुरुषांनाच आपल्या घरी बोलावून त्याचे निर्वस्त्र व्हिडीओ तयार केले आहेत. बाजारात अनोळखी तरुणांसोबत काही कारणावरुन ओळख केल्यानंतर त्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन नांदेडातील कॅनॉल रोड भागातील प्रकाशनगर येथील रुमवर बोलावयाचे. या ठिकाणी शरीर संबंध करण्यासाठी ललनांचा वापर करुन उद्युक्त केल्यानंतर पुरुषाला निर्वस्त्र करुन त्याचे व्हिडीओ तयार करण्यात आले होते. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणाला १ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. या तरुणाची महिलेसाेबत भोकर येथील बाजारात ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने तरुणाला नांदेडला बोलाविले.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि. उदय खंडेराय यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या टोळीच्या मागावर होते. त्याबाबत माहिती मिळताच या टोळीतील सदस्य पुणे येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी या प्रकरणात विशाल हरिष कोटीयन रा. कलामंदिर, नितीन दिनेश गायकवाड, रा. साठे चौक, सुनील ग्यानोबा वाघमारे, रा. पौर्णिमानगर, नीता नितीन जोशी, रा. प्रकाशनगर आणि राधीका रुपेश साखरे, रा. गणेशनगर असे आरोपींची नावे आहेत. त्यांनी काही जणांचे व्हिडीओ बनवून त्यांना खंडणीही मागितल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात खंडणीची मागणी झाली असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे.