नांदेड : प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमरावती - पुणे ही द्विसाप्ताहिक रेल्वे गाडी सुरू केली असून, या रेल्वेच्या ४४ फेऱ्या केल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मागील महिनाभरापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे गाड्या फुल्ल होऊन धावत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमरावती - पुणे ही द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू केली आहे. पुणे - अमरावती (०१४३९) ही रेल्वे गाडी पुणे येथून १६ डिसेंबर ते २६ फेब्रुवारीदरम्यान दर शुक्रवार आणि रविवारी रात्री १०:५० वाजता सुटणार आहे. दौंड, लातूर, परळी, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता ती अमरावती येथे पोहचेल.
तसेच अमरावती - पुणे (०१४४०) ही रेल्वे गाडी १७ डिसेंबर ते २७ फेब्रुवारी या काळात दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ७:५० वाजता अमरावती येथून सुटेल. अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, परळी, लातूर, दौंडमार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:२० वाजता पुणे येथे पोहोचेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली.