बारूळ : जिल्ह्यासह परजिल्ह्यांमधील कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने तालुक्यातील बारूळ परिसरातील मजुरांना ऊसतोडीचे वेध लागले आहेत. वाडी, तांड्यांवरील कामगार ऊसतोडीला निघाल्याने वस्त्या, वाडी, तांडे, गावे आता ओस पडू लागली आहेत. दरम्यान, या कामगारांना निरोप देताना कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत.
गेल्यावर्षी परतीच्या दमदार पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे मजूर आर्थिक अडचणीत सापडले होते, तर यंदा अति पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टाकलेला खर्चही घरात न आल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. मात्र, उसाचे उत्पादन चांगले असल्यामुळे ऊसतोड कामगारांसह मजुरांनाही यंदा कारखान्यांवर काम मिळणार आहे.
तालुक्यात साखर कारखाना नसल्यामुळे बारूळ, बाचोटी, हळदा, धर्मापुरी, चिंचोली, तेलूर, राहाटी, दहिकळंबा, मंगल सांगवी, औराळा, चिखली, काटकळंबा, पेठवडज, परिसरातील मसलगा नारनाळी, येलूर, वरवट वाडी, तांडे यासह अन्य गावांतील ऊसतोड मजुरांना दरवर्षी जिल्ह्यातील कुंटूर कारखाना, बाऱ्हाळी कारखाना, वागलवाडा कारखाना, शिवडी कारखाना यासह परजिल्ह्यांतील लातूर, अंबाजोगाई, परभणी येथील कारखान्यांमध्ये ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला असल्याने बारूळ परिसरासह अनेक गावांतील वाडीत तांड्यावरील ऊस कामगार ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. तालुक्यातील मजूर परजिल्ह्यांतील ऊसतोडणीसाठी जात आहेत. दररोज ५ ते १० ट्रक, ट्रॅक्टरमधून जाताना दिसत आहेत.
कुटुंबियांकडून निरोप, मजूर कारखान्याकडे रवानावर्षभरातील पाच ते सहा महिने ऊसतोडणीतून मजुरी मिळते. उर्वरित कालावधीत हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. ऊसतोडणीसाठी न गेल्यास संसाराचा गाडा हाकायचा कसा, हा प्रश्न उपस्थित राहत असल्याचे हळदा येथील ऊसतोड मजुरांनी सांगितले. वर्षभरातील जवळपास पाच महिने गावी राहत नसल्याचेही ते म्हणाले. ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक घरातील मोठ्या व्यक्तींना हे काम करावे लागते. त्यामुळे लेकरांना सोडायचे कुठे, हा प्रश्न निर्माण होत असतो. संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन उसाच्या फडात दाखल होत आहे. लेकरांचे शिक्षण कोरोनामुळे झालेच नाही. पुढेही काय परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित ठरवता येत नसल्यामुळे सोबत लेकरांना घेऊन आलो, असे अनेक मजुरांनी सांगितले.