मुखेड : शहरातील फुलेनगर भागात राहणाऱ्या इयत्ता ९ वी तील विद्यार्थिनीस ताप आल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात १४ मार्च रोजी सायंकाळी दाखल केले. परंतु, १५ रोजी पहाटेच्या सुमारास रुग्णालयात या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वैद्यकीय उपचार योग्य न मिळाल्याने तसेच उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळेच विद्याथिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.शहरातील व्यंकट गणपत सोनकांबळे यांची मुलगी प्रतीक्षा सोनकांबळे (वय १५) हिस ताप आल्याने १४ रोजी दुपारी ४़३० वाजता उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले असताना वॉर्ड क्र. १७ मधून वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयात दाखल करून ५़२० वाजता वॉर्ड क्र. ४१ मध्ये दाखल करण्यात आले. रात्री तिचा ताप अधिकच वाढत गेला. ही बाब प्रतीक्षा यांच्या वडिलांनी उपस्थित डॉक्टरांचे लक्ष वेधले, मात्र डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने ताप वाढत जावून प्रतीक्षा हिचा मृत्यू झाला. १५ रोजी सकाळी ५.४० वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले. मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे असून यात १४ तज्ज्ञ डॉक्टर व अंदाजित १०० पेक्षा जास्त कर्मचारी असूनसुद्धा केवळ ताप आलेल्या प्रतीक्षा या रुग्णास १२ तास राहून योग्य औषधोपचार व सेवा न मिळाल्याने मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला असून जबाबदार वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरावर कडक कार्यवाही करुन तात्काळ निलंबन करण्याची गरज असल्याचे मत माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी व्यक्त केले़लोहबंदे यांनी नांदेड येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शवविच्छेदनातून काही आढळून आल्यास दोषींवर योग्य ती कार्यवाही करणार असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी केला. मयत प्रतीक्षा सोनकांबळे हिस ३ बहिणी व १ भाऊ, आई-वडील असा परिवार असून ती मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे शाळेमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे वडील व्यंकट सोनकांबळे घड्याळ दुरुस्तीचे काम गावोगावीच्या बाजारात जाऊन करीत कुटुंब चालवत होते़
- डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रतीक्षाच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करुन प्रतीक्षाचा मृतदेह रुग्णालयातच ठेवला. मुखेड पोलिसांतही वडील व्यंकट सोनकांबळे यांनी तक्रार दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली. तपास पो.ना़ चंदर आंबेवार व पोक़ॉ़ महेंद्रकर हे करीत आहेत.