नांदेड : जानापुरी येथील शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबाला प्रजाकसत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच एकर जमिनीचे कागदपत्रे देण्यात आली होती़ मंगळवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत शहीद संभाजी कदम यांच्या पत्नीला पाच एकर जमिनीचा ताबा देण्यात आला आहे़ राज्यात शहिदाच्या परिवाराला जमीन देण्याचा मान नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे़देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना राज्यातील अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे़ या शूरवीरांच्या बलिदानानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी शासनाकडून त्यांना विविध सवलती देण्यात येतात़ २८ जून २०१८ रोजी राज्य सरकारने शहिदाच्या परिवाराला उपजीविकेसाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाची नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी केली़ शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबाला खरबी या गावात पाच एकर जमिनीचा ताबा देण्यात आला़ अशाप्रकारे शहीद परिवाराला जमीन देण्याचा पहिला मान नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे़ यावेळी लोह्याचे तहसिलदार व्ही़एम़परळीकर, जिल्हा सैनिक कार्यालयाचे कमलाकर शेटे, खरबीचे सरपंच आणि शहीद संभाजी कदम यांच्या पत्नी शीतल या उपस्थित होत्या़
- पाच एकर जमीन मिळाल्यामुळे परिवाराच्या उपजीविकेसाठी शेती करणार असल्याची प्रतिक्रिया वीरपत्नी शीतल कदम यांनी दिली़ सैनिक कार्यालयाचेही त्यांनी आभार मानले़
- सैन्यात ग्रामीण भागातील तरुणांची संख्या अधिक आहे़ सैन्यात नोकरी करताना उत्पन्न किती याचा विचार न करता देश प्रेमाने भारावून तरुण सैन्यात जातात़ अशा योजनांमुळे कर्तव्यावर असलेल्या सैनिकांचे मनोधैर्य निश्चितच उंचावेल अशी प्रतिक्रिया माजी सैनिक कमलाकर शेटे यांनी दिली़