ग्रामीण पोलिसांचा संशय ठरला खोटा
नांदेडः सिडको येथील डॉ. देवानंद जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
डॉ. जाजू यांचा बुधवारी राहत्या घरातच मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या उशाजवळ झोपेच्या गोळ्यांचे रिकामे पाकीट आढळले होते. घटनास्थळावरील एकूण स्थिती बघता, नांदेड ग्रामीण पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला होता. परंतु, शवविच्छेदनाअंती पोलिसांचा हा संशय खोटा ठरला. डॉ. जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
डॉ. देवानंद जाजू हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय चालवित होते. तसेच, भारतीय जनता पक्षातही ते सक्रिय होते. सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार राहत होता.