शेतातील रस्त्याच्या कारणावरून मारहाण
नांदेड : शेतातून उसाचा ट्रक नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १३ मार्च रोजी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली.
प्रमोद संभाजी पवार हे शेतात काम करीत असताना, आरोपी त्यांचा उसाचा ट्रक घेऊन पवार यांच्या शेतातून जात होता. यावेळी पवार याने माझ्या शेतातून रस्ता देत नाही, असे म्हणून त्यांचा ट्रक अडविला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पवार यांना फावड्याच्या दंडुक्याने जबर मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात प्रमोद पवार यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुधात पाणी टाकले म्हणून वाद
बिलोली तालुक्यातील मौजे शेळगाव थडी येथे दुधात पाणी का टाकले, म्हणून वाद घालत घरात घुसून मारहाण करण्यात आली. ही घटना १४ मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात सुदर्शन रामपूरे यांच्या तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मूलबाळ होत नसल्याने छळ
नांदेड : मुलबाळ होत नसल्याने विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. ही घटना कंधार तालुक्यातील उमरज बोरी येथे घडली. सासरच्या मंडळींनी माहेराहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली होती. त्यासाठी पीडितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
नांदेड : नांदेड ते लातूर रस्त्यावर बेरळी फाट्याजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ५ मार्च रोजी घडला होता.
गोविंद बाबुराव कंधारे रा.बेरळी ता.लोहा हे ५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेड ते लातूर रस्त्यावरून जात असताना, भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिली. या अपघातात गोविंद कंधारे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनिता कंधारे यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.