मरखेल : देगलूर तालुक्यातील टाकळी (जहांगीर) येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. मृत शेतकऱ्याचा मृतदेह पाण्यात वाहून शेजारील तेलंगणा राज्यातील चेंडेगाव (जिल्हा संगारेड्डी) याठिकाणी सापडला आहे. मृत शेतकरी हा आपल्या शेतातून घराकडे येत असताना ही दुर्दैवी घटना घडली होती.
शेतकरी रामदास मलगोंडा मनगीरे वय : ५५ वर्ष रा. टाकळी (जहांगीर) ता. देगलूर हे शेजारील सीमेवर असलेल्या तेलंगणा राज्यातील चेंडेगाव शिवारातील शेताकडे काल सायंकाळी फेरफटका मारायला गेले होते. दरम्यान मरखेल परिसरात काल जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामध्ये या भागातील सर्वच नाले- ओहोळ जोराच्या प्रवाहाने वाहत होते.
सायंकाळी सातच्या सुमारास रामदास मनगीरे हे आपल्या टाकळी गावाकडे परतत असताना परतीच्या मार्गावर असलेल्या झरी- माळेगाव रस्त्यावरील नाल्यात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेले. दरम्यान महाराष्ट्र सीमेवरील चेंडेगाव (तेलंगणा) याठिकाणी या नाल्याच्या प्रवाहात काटेरी झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. सदरील गाव हे तेलंगणा राज्यातील जुक्कल पोलीस ठाण्याअंतर्गत येते. मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, उपनिरीक्षक अजित बिरादार, जमादार प्रकाश कुंभारे हे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची माहिती घेतली. याप्रकरणी जुक्कल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मरखेल पोलिसांनी दिली.