सुनील चौरे /हदगाव
आधुनिक युगात इंच - इंच जागेसाठी वाद करणार्या सख्ख्या भावाची कमतरता नाही. संपत्तीसाठी आई-वडिलांचा घात करणारेही समाजात आहेत. मात्र गावचा विकास व्हावा, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी स्वत:ची जमीन देणारे नसल्यातच जमा आहेत, अपवाद मात्र पळसवाडीच्या एका शेतकर्याचा. त्यांनी स्वत:ची जमीन शाळेसाठी देवून नवा आदर्श घडविला.
मनाठा गावापासून ३ कि. मी. अंतरावर जंगलात वसलेलं पळसवाडी गाव. ६00 लोकसंख्या. ६0 ते ७0 घरांची संख्या. अठरा विश्व दारिद्रय. सर्वच गरिबीचेच दर्शन. याच गावातील पुरा नाईक यांनी पिण्याच्या पाण्यासाठी शेतातील विहीर ग्रामस्थांना दिली. हे गाव सावरगाव गट ग्रामपंचायततंर्गंत येते. सावरगावचे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे पाईपलाईन करुन पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. विहीर खोदण्यात आली. मात्र विहिरीला पाणी लागले नाही. पूर्वीच्या विहिरीचे पाणी तांड्याला दिले जाते.
किल्लारीचा भूकंप झाला. त्यावेळी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. टाकीच्या बाजूलाच नाल्याचे पाणी मुरते. नवीन नळयोजना गावात आवश्यक आहे. वीज बंद असल्याने इतर पर्यायही वापरता येत नाहीत. मनाठा ते केदारनाथला जाताना दक्षिणेकडे ३ कि. मी. अंतरावर हा तांडा आहे. मनाठा-सावरगाव-पळसवाडी असे ८ कि. मी. अंतर आहे. दोन्ही मार्गाकडून गावाला रस्ता नाही. ६६ वर्ष उलटली स्वातंत्र्य मिळून. मात्र गावकरी रस्त्यापासून वंचित आहेत. यावर्षी रस्त्याला मंजुरी मिळाली. कामही सुरु झाले, मात्र वनविभागाने हे काम बंद केले. वनविभागातून हा रस्ता जात असल्याने वनविभागाने हस्तक्षेप करुन रस्त्याचे काम बंद पाडले.गावातील खांबावर तीन वर्षांपासून लाईट नाहीत. खांबे उभे आहेत, रात्री तांडा अंधारात असतो. शाळेतही वीज नाही. शाळेला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे प्राणी-पक्षाचा मुक्त संचार असतो. दरम्यान, माळझरा गावात ६0 पैकी ३२ शौचालय वापरात आहेत. दलित वस्तीसाठी दोन-चार घरकुल मंजूर झाले.
--------
शाळेला मैदान नाही. गावात विद्यार्थ्यांना कुठेच खेळण्यासाठी मैदान नाही. फक्त उन्हाळ्यात शेत रिकामे झाले की, मैदान मिळते. तांड्यवरील वयोवृद्ध, गरोदर माता, मुलबाळांना आजाराने घेरल्यास मनाठा, हदगाव शिवाय दवाखाना नाही. मनाठा येथे उपकेंद्र आहे. तेथेही डॉक्टर नसतो. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात पाठविले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र ३0 कि. मी. अंतरावर निमगाव येथे आहे. ते लांब पडते. बरडशेवाळा २0 कि. मी. वर आहे. गाव निमगावला जोडल्यामुळे दवाखान्याचा फायदा होत नाही. रस्त्याअभावी गरोद मातांचे जीपमध्येच किंवा डोंगरातच प्रसूती झाल्याची उदाहरणे आहेत.
■ गावात हातपंप नाही. एक होता तोही बंद आहे. अध्र्यां फर्लांगवरुन पाणी शेंदून आणावे लागते. म्हातार्या बायकांना ते शक्य नाही. नवीन सुना टाळाटाळ करतात. तांड्यात मिनी अंगणवाडी आहे. ४५0 लोकसंख्या गावची असल्यास एका अंगणवाडीला मान्यता असते, मात्र येथे ६00 लोकसंख्या असूनही या पदाला मान्यता नाही. शाळेच्या जुन्या व पडक्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरते, मात्र सध्या इमारत ढासळण्याच्या स्थितीत असल्यामुळे ताईच्या घरीच अंगणवाडी भरविण्यात येते. अंगणवाडीत २९ विद्यार्थी आहेत. जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
■ पळसवाडीचे शेतकरी सेवा फातू राठोड (वय १00) यांनी गावात प्राथमिक शाळेची नवी इमारत व्हाणी, यासाठी २00४ मध्ये मुख्य रस्त्यावरील ३ गुंठे जमीन शाळेला विनामूल्य दान केली. जागा दान करताना घरात वाद झाला, तसाच गावातही झाला. या टोकाला शाळा नको, त्या टोकाला नको, असे अनेकांचे म्हणणे झाले. परंतु दूरदृष्टी ठेवून तत्कालिन शिक्षक पंडित कदम यांनी राठोड यांच्या जागेला पसंदी दिली. शाळा बांधणेही झाले. शाळेतच महादेव मंदिरही बांधण्यात आले. बंजारा समाजाची मुलंशिक्षणाच्या प्रवाहात यावी, याच उद्देशाने शेतमजीन दान करण्याचा उपक्रम राठोड यांनी राबविला.