नांदेड : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना शासनाकडून नुकसानभरपाईसाठीही अफलातून अटींची बंधने टाकल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़
यंदा पावसाळ्यात तब्बल ४५ दिवसानंतर पेरणीलायक पाऊस झाला होता़ त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ आॅक्टोबर अखेरीस जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी ही पिके काढणीस येतात़ यंदा पिकांना बहारही चांगला होता़ त्यामुळे शेतकरी आनंदात होता़ परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन टाकले़ सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीनला कोंब फुटले़ तर ज्वारी काळी पडली़ पांढरे सोने असलेल्या कापसाचीही बोंडे गळून पडली़
अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली़ परंतु नुकसान भरपाईसाठी घातलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ नुकसानग्रस्त पिकांचे ठिकठिकाणची पुष्टी करणारे छायाचित्र आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत़ परंतु पिकांचे हे फोटो जीओ टॅगनेच द्यावेत, अशी अट घालण्यात आली आहे़ शेतकऱ्यांनी भरलेला हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी सुरुवातीला कागदावर अर्ज करण्यास सांगण्यात आले होते़ त्यानुसार काही शेतकऱ्यांनी अर्जही केले़ काहींनी आपले अर्ज ई-मेलद्वारे पाठविले़ त्यानंतर महसूलने पंचनामा नमूना भरून देण्याच्या सूचना केल्या़ तो पंचनामा नमुना शेतकऱ्याच्या हाती पडतो तोच दुसऱ्याच दिवशी त्यामध्ये पुन्हा बदल करण्यात आला़ अधिसूचित पिकांकरिता विहित जोडणीअंतर्गत संयुक्त पंचनाम्याच्या नावाखाली तो भरून घेण्याचे आदेश देण्यात आले़ परंतु हा निर्णयही एक दिवसात बदलण्यात आला़ पीक विमा कंपनी, कृषी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे़ प्रत्येकवेळी अर्जाचा नमुना, पंचनामा बदलणे शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करणे ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची बाब ठरत आहे़ त्यामुळे नुकसानीचे अर्ज भरावेत किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे़
शेतकऱ्यांना आठ दिवसांत वेगवेगळे तीन अर्ज देण्यात आले आहे़ शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविताना शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्ची पडत आहे़ परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना आता रबीवरच शेतकऱ्यांची मदार आहे़ परंतु शेतीतील कामे सोडून नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना वनवन भटकावे लागत आहे़दरम्यान, जीओ टॅगने फोटो मागणाऱ्याला गावबंदी करण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे़ माहूर तालुक्यातील किसान सभेने याबाबत तहलिसदारांना निवेदन दिले आहे़ पीकविमा कंपनीच्या अशा हट्टामुळे शेतकऱ्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे़
सत्तास्थापनेच्या नाट्याबाबत संतप्त प्रतिक्रियापरतीच्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा दिवाळी साजरी करता आली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य सुरु आहे, अशी प्रतिक्रिया रामराव पवार यांनी दिली़ हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे़ शेतातील सोयाबीनच्या ढिगाला कोंब फुटले आहेत़ ज्वारीही काळी पडली आहे़ रबी हंगाम पुरता गेला आहे़ आता खरीप हंगामावर सर्व मदार आहे़ परंतु खरीप हंगामासाठी पैशाचा जोड कसा लावायाचा? असा सवाल दिगंबर शिंदे यांनी केला़