दत्ता ढेपाळे (वय ५५, रा.मुगट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. यावेळी दत्ता ढेपाळे व त्यांचा मुलगा झोपडीत होते. बैल चारण्यासाठी त्यांनी बैल सोडले होते. पावसातच ते झोपडीच्या बाहेर आले आणि बैलाला घेऊन झोपडीकडे येत असताना अचानक वीज कोसळून त्यात ढेपाळे यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ५ वाजता त्यांची उत्तरीय तपासणी मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी मुगट येथे अशीच घटना घडली होती. त्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, धर्माबाद शिवारात वीज पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये बाळापूर शिवारातील रमेश सूर्यकार यांना विजेची वाफ लागल्याने ते जखमी झाले, तर त्यांचा बैल वीज कोसळून मरण पावला. दुसरी घटना लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या येळवत रस्त्यावर घडली. यात हणमंत गणेश स्वामी (वय २४, रा.रत्नाळी) व गणेश नरसिंग शंकरोड (वय २१, रा.शिक्षक काॅलनी, धर्माबाद) या दोघांना विजेची वाफ लागल्याने ते जखमी झाले, तर आयटीआयजवळ येळवत रस्त्यावर वीज पडून मनोज पाटील शिंदे यांचा बैल जागीच मरण पावला.
जखमींना धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात डाॅ.संजय पोहरे यांनी प्राथमिक उपचार करून सर्वांना नांदेडला हलविले. तलाठी सहदेव बासरे यांनी घटनेचा पंचनामा केला.