लोहा : लोहा तालुक्यातील सात मंडलामध्ये गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागातर्फे हाती घेतलेले सातबारा उतारा संगणकीकरण करण्याचे लोहा तालुक्यातील सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुकावासियांना आता लवकरच ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहेत.
जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा पुरावा म्हणून सातबारा उताऱ्याला महत्त्व आहे. अनेक वेळा तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. लोकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन शासनाने २०१३ पासून महसूल व वन विभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण ई-फेरफार कार्यक्रम संपूर्ण राज्यात हाती घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाईन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतरही अनेक ऑनलाईन सातबारामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने जमीन मालकांना असे चुकीचे सातबारे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे सातबारा ऑनलाईन प्रक्रियेत झालेल्या चुका सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने सातबारा ऑनलाईनचे काम हाती घेण्यात आले.
मंडल अधिकाऱ्यांसह तलाठ्यांच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या जागा असताना तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी, तलाठी आदींनी सातबारा उतारा ऑनलाईन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. एक टक्का काम आठवड्यात पूर्ण होणार दरम्यान, उर्वरित केवळ एक टक्का काम शिल्लक असून ते सातबारा उताऱ्यावरील तांत्रिक अडचणींमुळे रखडले असून येत्या आठवडाभरामध्ये पूर्ण होईल, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग प्रमुख गोविंद पटने यांनी दिली
कोट
लोहा तालुक्यातील सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुकावासियांना आता लवकरच ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहे. तालुक्यात एकूण ११८ महसुली गावे, ७ मंडळे ५० हजार ८५९ सातबारा उतारे एकूण उताऱ्यांपैकी ऑनलाईनचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे - राम बोरगावकर, नायब तहसीलदार लोहा.