हिमायतनगर : दरेसरसम-आंदेगाव साठवण तलावाचे दार बंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ परंतु, सदर तलावासाठी संपादित जमिनीच्या मोबदला वाटपात समानता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून समान मावेजा द्यावा, यासाठी शेतकरी एकवटले आहेत़ त्यामुळे अकरा वर्षांपासून सुरू असलेला तलाव पूर्णत्वास जाण्यास पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे़दरेसरसम - टेंभी साठवण तलावाचे काम पूर्णत्वास येवून अनेक वर्षे लाटली़ केवळ तोंडावरील बांध कोंडण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना या शिवारातील शेतक-यांनी जमीन संपादनामध्ये आर्थिक मावेजा समान मिळाला नसल्याने आंदोलने करुन तलावाचे काम बंद पाडले होते़ सन २०१७ मध्ये राजकीय हस्तक्षेप व पाटबंधारे विभागाकडून तोडगा काढल्याने एप्रिल - मे २०१७ पासून तलावाचे बांध टाकण्याचे काम सुरु करण्यात आले़ परंतु, पुन्हा यासाठी संपादित केलेल्या अनेक शेतक-यांना मावेजा मिळाला नाही़ज्या शेतकºयांना मावेजा मिळाला आहे़ त्यांच्या मावेजामध्येही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने या भागातील शेकडो शेतकºयांनी सर्वांच्या जमिनीला समान मोबदला द्यावा अन्यथा तलावाचे काम बंद पाडू, वेळप्रसंगी हक्काच्या मोबदल्यासाठी कोणत्याही क्षणी आत्मदहन करू असा इशारा दिल्याने साठवण तलाव पूर्ण होण्यास आडकाठी निर्माण झाली आहे.हिमायतनगर तालुक्यात सिंचनासाठी पाणी नाही तसेच हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात़ यासाठी दीड दशकांपूर्वी शासनाकडून आंदेगाव, दरेसरसम - पवना, टेंभीमध्ये जंगलाच्या पायथ्याशी साठवण तलाव मंजूर झाला. त्यासाठी २००७ मध्ये जवळपास सव्वाशे शेतक-यांची जमीन संपादित करण्यात आली़ परंतु शासनाने त्यापैकी २५ लोकांना नवीन दर म्हणजे ९़५ लाख आणि १०० शेतक-यांना केवळ १़५ लाख एकरी असा मावेजा दिला आहे.शासनाच्या दुटप्पी भूमिकेस विरोध दर्शवत शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली़ सर्वांना समान मावेजा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरु केला आहे. तलावाच्या निर्मितीनंतर या भागातील दरेसरसम, पवना, भिशाचीवाडी, आंदेगाव, सरसमसह अनेक गावांतील हजारो एकर जमीन सिंचनाखाली येवून उन्हाळ्यातील पाणी टंचाईपासून मुक्ती मिळणार आहे.शासनाकडून समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रश्न मार्गी लागत नाही़ परंतु, आंदेगाव, टेंभी, सरसम, पवना, दरेसरसम, भिशाचीवाडी या गावांतील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मोर्चे आंदोलन केले. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींची भेट घेतली़ मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही़बंद पडलेले काम सुरू : काही शेतक-यांना ९़५ तर काहींना १़५ लाख
- माजी खा. सुभाष वानखेड यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात शेतक-यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन बंद पडलेले तलावाचे काम सुरु केले़ परंतु, अनेक शेतक-यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देणे बाकी आहे़ तर काही शेतकºयांना साडेनऊ लाख रूपये मावेजा दिला आणि शंभराहून अधिक शेतक-यांना केवळ दीड लाख रूपये मावेजा दिला़
- तलावासाठी संपादित झालेली जमीन सर्वांची सारखीच असताना शेतक-यांना देण्यात येणा-या मोबदल्यात भेदभाव का केला जातोय? तसेच कमी - अधिक मावेजा देऊन भूसंपादन खात्याचे अधिकारी हेराफेरी करण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा संतप्त सवाल मावेजापासून वंचित तसेच कमी मावेजा मिळालेल्या या भागातील शेतक-यांनी उपस्थित केला आहे.
- शेतक-यांचा तलावाला विरोध नाही, परंतु मावेजामध्ये भेदभाव करू नये, सर्वांना समान मोबदला द्यावा, अन्यथा तलावाचे काम बंद पाडू़ वेळप्रसंगी आत्मदहन करू असा इशारा शेतक-यांनी दिला आहे़ दरम्यान, या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून शेतक-यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर श्रीराम यलकेवाड, गणेश यदमवाड, परमेश्वर निळकंठे, सरस्वताबाई यदमवाड, गोविंद यलकेवाड, छाया रेड्डेवाड, पेंटुबाई अंचतवाड, परमेश्वर गोसलवाड, रामदास चव्हाण, दिलीप चव्हाण, मारोती राठोड, रंगा राऊत, विशवनाथ सावते, रामराव जाधव, जनाबाई नरवाडे, विठ्ठल पोतरे, लक्ष्मण गंदेवाड, अनिता अन्नमवाड, यमुनाबाई यदमवाड यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.