नांदेड: खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतक-यांची लगबग सुरू असून, त्यात अवकाळीचे विघ्न येत आहे. मे महिना अर्धा संपला असल्याने आता मृग नक्षत्राच्या पेरणीसाठी शेतकरी शेतजमिनीची नांगरणी, वखरणी करण्यात व्यस्त झाले आहेत. दुसरीकडे कोणत्या कंपन्यांचे बियाणे चांगले राहिल, याची चाचपणीही मोंढा मार्केटमध्ये करताना दिसून येत आहे. यंदा खरीप हंगामात तब्बल ७ लाख ७४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. यात ४ लाख ५२ हजार हेक्टर सोयाबीनसाठी तर २ लाख १०५०० हेक्टर कापूस पिकासाठी प्रस्तावित केले आहे.
यंदा पाऊस कसा राहणार, यावर खरिपाच्या पेरणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. सध्या अवकाळी पाऊस पडत असला तरी मृग नक्षत्रावर पाऊस वेळेवर पडणे गरजेचे आहे. यंदा खत, बियाण्यांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. पेरणीसाठी वेळेवर खत, बियाणे कसे उपलब्ध होईल, यासाठी शेतकऱ्यांचेही आर्थिक नियोजन सुरू आहे.
सोयाबीनसाठी साडेसहा लाख हेक्टरजिल्ह्यात खरीप हंगामासाठी पावणे आठ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असले, तरी यात सर्वाधिक साडेसहा लाख हेक्टरमध्ये सोयाबीन व कापसाची तर अन्य क्षेत्रावर इतर पिकांची पेरणी होईल. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र स्थिर राहिल, कापसाचे प्रस्तावित क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढले आहे.
दोन लाख मे. टन खत लागणारखरीप हंगामासाठी २ लाख ६०० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. त्यात युरिया ५३ हजार ९०० मे.टन, डीएपी ३३ हजार ३०० टन, एमओपी ८ हजार टन, एचपीके ७९ हजार ८०० मे.टन, एसएसपी २५६०० टन असे एकूण २ लाख ६०० मेट्रिक टनाचा समावेश आहे.
असे आहे खताचे नियोजनएप्रिल महिन्यात १२ हजार २२३ मे.टन, मे महिन्यात २६७६४ मे.टन, जून ५३ हजार ९९ टन, जुलै ४५,७८२ टन, ऑगस्ट ३७,९८४ मे.टन, तर सप्टेंबर महिन्यात २५,३४८ मेट्रिक टन रासायनिक खताचे नियोजन केले आहे.
साडेदहा लाख पाकिटांची मागणी, उपलब्ध झाले ६५ हजारकापसाच्या १ लाख ५२ हजार ५०० पाकिटांची मागणी केली असून बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६५ हजार कापसाची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. तर ज्वारी ९७५ क्विंटल, भात २१९ क्विंटल, तूर ३४९१ क्विंटल, मूग ५०३ क्विंटल, उडीद ७६१ क्विंटल, मका १५१ क्विंटल, तीळ ६ क्विंटल, तर सोयाबीन १ लाख १८ हजार ६५० क्विंटल बियाणे लागेल. यापैकी सोयाबीनेच ५२ हजार क्विटंल बियाणे उपलब्ध झाले आहे.