बोधडी व परिसरातील कोणत्याही गावातील तलाठी कर्मचारी आपल्या सज्जावर मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा होल्डिंग काढण्यासाठी तलाठ्यांना भेटण्यासाठी किनवट गाठावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व वाहनाचा खर्च वाया जात आहे. तलाठी कर्मचारी हा मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
तलाठी मंडळीचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांना किनवट गाठावे लागते. बोधडी व परिसरातील शेतकऱ्यांना तलाठ्यांना भेटण्यासाठी २५ किलोमीटर किनवट तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जिल्हाधिकारी नांदेड यांनी तलाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. तरीही तलाठी मुख्यालयी राहत नाही. तलाठ्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना सातबारा, होल्डिंग व योग्य माहिती गावात मिळत नाही. त्यामुळे शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना किनवट गाठावे लागते. शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. यासाठी तलाठी मंडळींना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.