किनवट (जि. नांदेड) : रबी हंगामातील पिकाला पाणी देण्यासाठी गावालगतच्या शेतात गेलेल्या ३१ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास किनवट तालुक्यातील सिंदगी (मो) येथे घडली.
हल्ल्यानंतर तरुणाने आरडाओरडा करीत अस्वलाच्या तावडीतून सुटका करवून घेतली. या हल्ल्यात सदर शेतकरी जबर जखमी झाला असून, किनवट येथील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी तेलंगणातील आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे.
कृषीपंपाना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने रबी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकरी, सालगडी यांना शेतात जाऊन पाणी द्यावे लागते. १४ जानेवारी रोजी सकाळी सिंदगी (मो) येथील शेतकरी दत्ता प्रभाकर वानखेडे (वय ३१) हे पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे गेले असता अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने पंजा मारल्याने वानखेडे यांचा उजवा कान तुटला असून हनवटीपर्यंत जखम झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत दत्ता वानखेडे यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉ.एम.व्ही. भुरके यांनी प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी त्यांना तेलंगणातील आदिलाबाद येथे पाठविले असून, वानखेडे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. भुरके यांनी सांगितले.
अस्वलाच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांत घबराटकिनवटसह माहूर तालुक्यातील लक्कडकोट, बेल्लोरी, पानधरा, अंजी, सिंदगी यासह अनेक गावे जंगलाच्या पायथ्याशी असून डोंगरदऱ्यात ही गावे येतात. वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ भयभीत आहेत. मागील काही दिवसांत किनवटसह माहूर तालुक्यात अस्वलाचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतशिवारात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांत दहशतीचे वातावरण आहे. उन्हाळ्यात हे हल्ले आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.