सभेदरम्यान, विषय सूचीमध्ये मांडलेल्या आठ विषयांसह ऐनवेळी आलेल्या चार विषयावर चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली. तसे ठरावही घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने १६ तालुक्यात बँकेच्यावतीने एटीएम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शासनाने कर्जमाफी जाहीर करताना चालू बाकीदार शेतकरी सभासदांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सदर अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने ते तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यासंदर्भातील ठराव घेण्यात आला.
जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, रब्बी हंगामात कर्ज वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासह विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मान्यता देण्यात आली.
चौकट
चिखलीकरांची रजा, तर अन्य तिघे गैरहजार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून शेतकरी हिताचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते. परंतु, शनिवारी पार पडलेल्या सभेस ६ संचालक अनुपस्थित होते. त्यापैकी खासदार प्रतापराव चिखलीकर आणि प्रवीण चिखलीकर यांची रजा होती तर नागेशराव आष्टीकर, गोविंदराव नागेलीकर, व्यंकटराव जाळणे हे गैरहजर होते.