लोहा (नांदेड ) : किरोडा तलावात तरूण मुलगा बुडत असताना त्याचा पिता मदतीसाठी गेला. मात्र दोघाही पिता-पुत्राचा यात बुडून करूण अंत झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
लोहा तालुक्यातील किरोडा येथील मुळ रहिवाशी आसलेले शेख कुटूंबीय मागील अनेक वर्षापुर्वी तेलंगणा राज्यातील निझामबाद येथील उदरनिर्वासाठी वास्तव्यास होते. शेख सत्तारअली शेख गफारअली (६० रा. खोजा काँलनी निझामबाद) यांच्या शेख गफारअली शेख सत्तारअली (२४) या मुलाचा दि. २ सप्टेंबरला विवाह झाला. त्या निमित्त शेख कुटूंबीय त्यांच्या मुळ गावी किरोडा येथील सरवरे मगदुम दर्गा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आज आले होते.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेख गफारअली हा पोहण्यासाठी किरोडा तलावात उतरला. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पित्यानेही पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पिता-पुत्र पाण्यात बुडून मृत्यु पावले. बाजुस आसणा-या शेख कुटूंबीयातील महिलांनी आरडा-ओरड केली असता कांहींनी तलावात उड्याही घेतल्या परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही मयतांचे शव मिळुन आले. शव शोधण्यासाठी स्वत: सपोनि वैजनाथ मुंढे व पोकाँ. माधव डफडे यांनी तलावात उतरून शोध घेतला. सोबत कंधार येथील गोताखोर नंदकिशोर बामणवाड, दाऊ मेकलवाड यांनीही प्रयत्न केले.