गाडी वि्क्री करण्यावरून मारहाण
नांदेड : मुदखेड शहरातील नवी आबादी भागात दुचाकी विक्री करण्यावरून झालेल्या वादानंतर एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मार्च राेजी घडली. गोविंद गंगाधर केशवर हे मित्रासोबत थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आला. दुचाकी विक्री करण्यावरून त्याने केशवर यांच्याशी वाद घालून मारहाण केली. या प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ट्रॅक्टर चालकावर हल्ला
नांदेड : नायगांव तालुक्यातील कुंटूर येथे किरकोळ कारणावरून एका ट्रॅक्टर चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मार्च रोजी घडली. सुनील बाबुराव गायकवाड हे चिकनच्या दुकानासमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आला. दिवसभर कुठे गेला होता असे म्हणून त्याने गायकवाड यांच्याशी वाद घालून मारहाण केली. या प्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वीज कापणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
नांदेड : महावितरणची सध्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत २१ मार्च रोजी मुखेड येथे एकाची वीज कापल्यानंतर संतप्त ग्राहकाने वीज कर्मचाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रवी ताराचंद थोटे हे महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता आहेत. ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन २१ मार्च रोजी मुखेडच्या हेडगेवार चौकात गेले होते. या ठिकाणी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा त्यांनी तोडला. त्याचा राग मनात धरून ग्राहकाने थोटे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोउपनि कुंभारे हे करीत आहेत.
सेवकाने तयार केले बोगस कागदपत्रे
नांदेड : नायगांव तालुक्यातील बेटक बिलोली येथे सेवकाने बनावट सही आणि शिक्के वापरून जन्म दाखले तयार केल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणात नायगांव पोलीस ठाण्यात सेवकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सेवेकाने तयार केलेले हे दाखले ऑनलाईन अपलोड करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात ग्रामसेवक केशव पवळे यांनी तक्रार दिली.