अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : - तालुक्यातील येळेगाव कारखाना रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक बसली. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रंगनाथ बळीराम जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जाधव येळेगाव येथे मुलीस भेटण्यासाठी येत होते. त्यांच्या अपघातीमृत्यूने बाप-लेकीची भेट अधुरी राहिलील्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येळेगाव शिवारात दुपारी येळेगाव ते कारखानामार्गे दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ट्रॅक्टर मार्फत ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र.एम.एच.२६ बि.सि.६५१८ कारखान्याकडे जात होता. याच दरम्यान, रंगनाथ बळीराम जाधव ( ५४, रा.असर्जन ) हे दुचाकीवरून येळेगाव येथे मुलीस भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होते. येळगाव येथील पाणी फिल्टरजवळ रंगनाथ यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. धडकेमुळे ते खाली कोसळले याचवेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच अपघातस्थळी जमादार बालाजी तोरणे व ईश्वर लांडगे यांनी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, तिन मुली,नातवंडे असा परिवार आहे.अर्धापूर पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे यांचे सासरे होते.
दरम्यान, ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतुकीचे प्रकार वाढले आहेत. यामधूनच हा अपघात घडला. उसाची अशी वाहतूक करणाऱ्या साधनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष कपाटे यांनी केली आहे.