लोहा (जि़ नांदेड ) : तालुक्यातील वागदरवाडी येथील पिता-पुत्राने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री ११़३० च्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
लोहा तालुक्यातील माळाकोळीपासून जवळच असलेल्या वागदरवाडी येथील केरबा पांडू केंद्रे (४०) व त्यांचा अकरावीत शिक्षण घेणारा मुलगा शंकर (१७) हे दोघेही सततची नापिकी आणि वाढलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत होते. शुक्रवारी दुपारी पिता-पुत्र शेताकडे गेले होते. गावापासून जवळपास दोन कि़मी़ अंतरावरील उत्तम केंद्रे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचे मृतदेह तरंगत असल्याचे एका गुराख्याच्या लक्षात आले. त्याने सदरील घटना केंद्रे कुटुंबियांस सांगितल्यानंतर स्थानिक गावकरी व पोलिसांच्या मदतीने दुपारी ४ वाजेदरम्यान एक प्रेत तर सायंकाळी ६ वाजे दरम्यान दुसरे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले़ दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माळाकोळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. याप्रकरणी माधव पांडू केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार माळाकोळी पोलिसात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.