नांदेड : शहरातील फारुखनगर येथे पतीकडून मुलीला होणा-या मारहाणीबद्दल विचारणा करणा-या विवाहितेच्या दोन भावांसह वडीलांना चार जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली़ या मारहाणीनंतर जखमी असलेल्या विवाहितेच्या वडीलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आता जावयाविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
आॅटोचालक असलेल्या हाजी अफजल बेग यांची बहिण नसरीन हिचा विवाह घराशेजारी राहणा-या शेख करीम यांच्याशी लावून देण्यात आला आहे़ तर शेख करीम याची बहिण हाजी बेग यांना देण्यात आली़ शेख करीम यांचे दोन भाऊ व बहिण हे उमरीला राहतात़ गेल्या एक महिन्यापासून शेख करीम हा नसरीन यांना मारहाण करीत होता़ त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी नसरीन यांचे वडील अफजल बेग चाँद बेग व भाऊ रहेमान बेग हे दोघे जण शेख करीम याला समजाविण्यासाठी त्याच्या घरी गेले होते़
परंतु यावेळी शेख करीम यांनी त्या दोघांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली़ त्यानंतर ते दोघेही जण घरी परतले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास शेख करीम त्याचे दोन भाऊ लतिफ, शेख अतिफ व आई फातिमा बेगम यांना घेवून हाजी बेग यांच्या घरी आले़ यावेळी त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला़ त्यानंतर शेख करीम, शेख लतिफ, शेख अतिफ व फातिमा बेगम यांनी लोखंडी रॉडने अफजल बेग, हाजी बेग व रहेमान बेग यांच्यावर हल्ला चढविला़ त्यानंतर या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ गंभीर जखमी असलेल्या अफजल बेग चाँद बेग (६०) यांना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले होते़ याप्रकरणात विमानतळ पोलिसांनी चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता़ दरम्यान, सोमवारी उपचारा दरम्यान अफजल बेग चॉंद बेग यांचा मृत्यू झाला़ त्यामुळे या प्रकरणात आता खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़