नांदेड : सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़ त्यामुळे सदर फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा फळविक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे़दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असून फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे़ ग्राहकांची मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याने टरबुजासह आंबे, द्राक्ष पिकविण्यासाठी केमिकल वापरल्या जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे प्राप्त झाल्या आहेत़ व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या आरोग्याला बाधा पोहोचेल, असे केमिकल, कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेली फळे विक्री करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ रसायनमिश्रीत फळे विक्री केल्यास कठोर शिक्षा होवू शकते़ त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीच्या फळांची विक्री करू नये़जिल्ह्यात ३० ते ३५ ठिकाणी रायपनिंग चेंबर्स असून त्याचा उपयोग करून फळे, केळी पिकवावीत़ जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही आणि व्यापारी, विके्रत्यांचेही हित जोपासले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे़कार्बाईड गॅसऐवजी इथेपॉन पावडरचा वापर करावा
- अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीनुसार कार्बाइड गॅस (कॅल्शियम कार्बाइड) च्या वापरास प्रतिबंध असून त्याचा वापर करुन आंबे पिकविल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
- आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) चा मर्यादित स्वरुपात वापर करण्याबाबत दिल्लीच्या भारतीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. सदर पावडर वापरताना ती फळांच्या (आंब्याच्या) प्रत्यक्ष संपर्कात येणार नाही याची दक्षता फळ विक्रेत्यांनी घ्यावी. हे पावडर एका आवरणात छोट्या स्वरुपात पॅक करुन फळाच्या (आंब्याच्या) ठिकाणी ठेवावे, जेणेकरुन आंबा पिकविण्यास मदत होईल. अशाप्रकारच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्या आहेत़
- उत्पादक, व्यापाऱ्यांनी नैसर्गिकरित्या आंबा किंवा इतर फळे पिकवण्यासाठी प्राधान्य द्यावे़ फळे व भाजीपाला विक्रेते कमिशन एजंट, वाहतूकदार यांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.