नांदेड : सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्टोन क्रशर चालकाकडून दहशतवादी रिंदा याचे नाव सांगून दोन लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या टोळीला पोलिसांनी शिताफीने पकडले. या टोळीने वजिराबाद हद्दीतील एका बिल्डरकडून काही दिवसांपूर्वीच तीन लाख रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. खंडणीची ही रक्कम पुण्याला हवालाद्वारे पाठविण्यात आली होती.
सोनखेड हद्दीत लोहिया या स्टोन क्रशर चालकाला रिंदाच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याबाबत लोहिया यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी पोलिस आणि आरोपींनी एकमेकांच्या दिशेने गोळीबार केला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच या प्रकरणात अन्य कुणाला खंडणीसाठी धमकाविल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वजिराबाद भागातील एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. या बिल्डरला ३ जून रोजी रिंदाच्या नावाने एक कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती. व्हॉट्सॲपवरून हा फोन केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी १५ वेळेस फोन करण्यात आला. तडजोडीअंती बांधकाम व्यावसायिकाने तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले. ही रक्कम हवालामार्गे १६ जूनला पुण्याला पाठविण्यात आली होती. आता याप्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अनेकांकडून खंडणी उकळल्याचा संशयरिंदाच्या नावाने ही टोळी खंडणी उकळत असल्याचे पुढे आले आहे. त्यासाठी उत्तम पंजाबी बोलणारा व्यक्ती व्हॉट्सॲपवरून कॉल करतो. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जाते. परंतु बोलणारा व्यक्ती रिंदा नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रिंदाच्या नावाने इतर गुंड खंडणी उकळत असल्याचे दिसून आले आहे. या आरोपींनी अनेकांकडून अशाप्रकारे खंडणी उकळल्याची शक्यता आहे.