श्रीनिवास भोसले, लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे. गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टर निर्णायक ठरला होता. परंतु, यंदा मराठा आंदोलकांची सर्वाधिक धास्ती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ‘ना महाविकास आघाडी ना महायुती’, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मराठा मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात, यावर निकाल अवलंबून असेल.
भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी २०१९ मध्ये ज्यांना पराभूत केले ते काँग्रेसचे बलाढ्य नेते अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून येथील लढाई त्यांच्या राजकीय करियरसाठी कलाटणी देणारी आहे. तर काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरवत नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावरील वंचितने यावेळी लिंगायत चेहरा म्हणून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली. परंतु, त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुक नाराज आहेत.
विद्यमान आमदारांची सावध भूमिका महायुतीच्या प्रतापराव चिखलीकर यांच्या बाजूने भाजपचे आमदार राम पाटील, डाॅ. तुषार राठोड, राजेश पवार व शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर आहेत. तर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्या बाजूने काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर आहेत. काही आमदारांनी प्रचारात झोकून दिले आहे. मात्र, भाजप व काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घटक पक्षातील पदाधिकारी सेटलमेंटचे राजकारण करू पाहत आहेत.
एकूण मतदार १८,४३,२४४ पुरुष ९,५०,९७६महिला ८,९२,१२९ शिवसेना अन् राष्ट्रवादीचे तुकडे कुणाच्या पथ्यावर- मागील पाच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निश्चितच होणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे झालेले दोन तुकडे कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. - अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, भाजपचे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हातचा राखून प्रचार करत आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे - नांदेड येथून मुंबई, पुण्यासाठी नियमित विमानसेवा सुरू करणे. जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योेग नसल्याने वाढती बेरोजगारी. - मराठा आरक्षण, सगेसोयरे आदी मागण्यांवरून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांकडून गावागावात केला जाणारा विरोध. - जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण, महिलांचे प्रश्न.
२०१९ मध्ये काय घडले?प्रतापराव चिखलीकर भाजप (विजयी) ४,८६,८०६अशोकराव चव्हाण काँग्रेस ४,४६,६५८ यशपाल भिंगे वंचित बहुजन आघाडी १,६६,१९६नोटा - ६,११४
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते २०१४ अशोक चव्हाण काँग्रेस ४,९३,०७५ २००९ भास्करराव पाटील काँग्रेस ३,४६,४०० २००४ डी. बी. पाटील भाजप ३,६१,२८२ १९९९ भास्करराव पाटील काँग्रेस ३,२७,२९३ १९९८ भास्करराव पाटील काँग्रेस ३,३७,७४४