देगलूर : चंद्रपूर येथील श्री महाकाली देवीची मुख्य यात्रा गुरुवार, १८ एप्रिलला असून देवीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक दरवर्षी चंद्रपूरला जातात. त्यामुळे या यात्रेचा फटका मतदानावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.चंद्रपूर व परिसरात श्री महाकाली देवी म्हणून प्रसिद्ध असली तरी देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील भाविकांत गडचांद्याची देवी असे संबोधल्या जाते.१८ एप्रिल रोजी चंद्रपूरच्या देवीची यात्रा भरते. या दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो भाविक जातात. तालुक्यातील प्रत्येक गावातून जीप, टेम्पो व ट्रकने भाविक या यात्रेसाठी जातात व दोन ते तीन दिवसांनी परत येतात.एकीकडे प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न करीत असतानाच योगायोगाने १८ एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या यात्रेचा मोठा फटका मतदानाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यात्रेचा फटका मतदानाला बसण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:26 AM