अनुराग पोवळे।नांदेड : बदलत्या जीवनशैलीमुळे दुर्धर अशा कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ ग्रामीण भागात या आजाराच्या लक्षणाकडे वेळीच लक्ष न दिल्याने या आजारातून मृत्यूनेच सुटका होत आहे़ हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात असून कँसरमुक्त नांदेडचे प्रयत्न सुरू आहेत़जिल्हा नियोजन समितीमार्फत हा प्रकल्प जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे़ एकूण कर्करोगापैकी एकतृतीयांश कर्करोगावर प्रतिबंध करता येतो़ तर एकतृतियांश कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास प्रभावशाली उपचाराने रुग्णांचे आयुष्य वाढविता येते़ जिल्ह्यात पुरुषामध्ये होणारा कर्करोग तसेच गर्भाशयाचे व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे़ या कर्करोगावर प्रभावशाली जनजागृती व योग्य तपासणी केल्यास प्रतिबंध घालता येवू शकतो़ जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या १५ शिबिरांमध्ये ४ हजार ४१८ रुग्णांची मोफत तपासणी केली़ त्यातील १ हजार ६५ रुग्णांना नांदेड येथे पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे़ या शिबिरामध्ये ५८६ रुग्ण कर्करोगाचे संभावित रुग्ण म्हणून आढळले़ त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले़ त्यांना आरोग्य शिक्षण देवून कर्करोगाविरूद्ध लढण्याचे शिक्षण दिले़ या तपासणीमध्ये तोंडात पांढरे चट्टे म्हणजेच तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात असल्याचे ३०२ रुग्ण आढळले आहेत़ तोंड न उघडणारे १७६ आणि मुखाचा कर्करोग झालेले १८ रुग्ण आढळले आहेत़ तोंडाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद आणि बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे़प्रकल्पासाठी १ कोटीचा निधीजिल्हा निवड समितीमार्फत १९ जानेवारी २०१८ रोजीच्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये कर्करोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला़ पालकमंत्री रामदास कदम यांनी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत या कार्यक्रमासाठी जवळपास १ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत़ यातून जिल्ह्यात कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत़ या कार्यक्रमासाठी ९ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ पालकमंत्री कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़आऱव्ही़मेकाने, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ़बी़पी़ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर म्हणून डॉ़जी़एच़वाडेकर, प्रकल्प मार्गदर्शक म्हणून डॉ़ नंदकुमार पानसे, प्रकल्प अधिकारी डॉ़राजेश पाईकराव, व्ही़दुलंगे, एस़भेलोंडे, वाय़सय्यद, मदतनीस के़सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते लाटकर, मेकाले यांचा समावेश आहे़प्रकल्पाचे स्वरूप
- या प्रकल्पांतर्गत ज्या ठिकाणी शिबीर घ्यायचे आहे त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तींकडून कर्करोगाची ओळख, कर्करोगासंबंधी माहिती, कर्करोगाचे निदान यासंबंधीचे प्रशिक्षण स्थानिक आशा वर्कर यांना दिले जाते़ शिबिरापूर्वी आशा वर्कर या घरोघरी जावून सर्वेक्षण तसेच संशयित रुग्णांची तपासणी करतात़ संशयितांना शिबिरास उपस्थित राहण्याची सूचना केली जाते़ तर प्रकल्प कर्मचारी गावोगावी जनजागृतीचे काम करत असतात़
- सदर शिबीर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात घेतले जात आहेत़ अतिसंशयित व कर्करोग रुग्णांना नांदेड येथे निदानासाठी बोलावले जाते़ कर्करोग रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जात आहेत. जिल्ह्यात हा प्रकल्प प्रभाविपणे राबविला जात असल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात यश मिळणार आहे़
- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचा लाभ पाहता पालकमंत्री रामदास कदम यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातही ही योजना राबविण्यासाठी नांदेड येथील डॉक्टरांना माहितीसाठी निमंत्रित केले आहे़त्याचवेळी लातूर, परभणी जिल्ह्यांतूनही नांदेडच्या या कॅन्सरमुक्तीच्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली आहे़
कॅन्सरचे वेळेवर निदान न झाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे़ कॅन्सरबाबत जनतेच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, जिल्हा कर्करोगमुक्त व्हावा या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे़ जिल्ह्यात होत असलेल्या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असून, कॅन्सरच्या रुग्णांचे निदान होत आहे़ त्यांच्यावर वेळेवर उपचार होत असल्याने मृत्यूचे प्रमाण निश्चित कमी होईल़- अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी
- सहा तालुक्यांमध्ये झालेल्या कर्करोग जनजागृती व नियंत्रण कार्यक्रमातील शिबिरात तोंडाच्या कर्करोगाचे १९, स्तनाच्या कर्करोगाचे ४ व गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कर्करोगाचे रुग्ण ३ असे एकूण २८ कर्करुग्ण आढळले आहेत़ या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोनार्क कर्करोग रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत़ तर एका रुग्णाला बार्शी येथील नर्गिस दत्त रुग्णालयात पाठविण्यात आले.
- जिल्ह्यातील ६ तालुक्यांत आतापर्यंत ४ लाख घरांमध्ये कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यात आली आहे़ जिल्ह्यात १६ तालुक्यांतील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र व १६ ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात शिबिरे घेतली जात आहेत़ आतापर्यंत ६ तालुक्यांतील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे़