लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्याची सत्ता ठरावीक लोकांपुरतीच मर्यादित आहे़ राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी या सत्तेत वंचितांना वाटा मिळाला पाहिजे़ त्यासाठीच वंचित बहुजनांची आघाडी स्थापन केल्याचे सांगत, समाजातील मोठा वर्ग, नवा समूह आज उभा राहत आहे़ त्यांना व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल़ असे सांगतानाच यापुढील लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी असेल, असे स्पष्ट प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड़प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले़येथील कै़शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित विराट बहुजन मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी मंचावर माजी आ़ लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, माजी खा. व्यंकटेश काब्दे, विजय मोरे, जाकेर चाऊस, प्रा़डॉ़ यशपाल भिंगे, रामचंद्र येईलवाड, प्रा़ राजू सोनसळे, महेंद्र देमगुंडे, प्रदीप राठोड यांच्यासह विविध जाती घटकातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ मेळाव्याच्या प्रारंभी विविध जातींच्या पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करीत बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली़अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली़ भाजपाचा अजेंडा संविधानविरोधी आहे़ मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीची भूमिकाही स्पष्ट नाही़ या पक्षांनी या वंचित घटकाला सोबत घेतले असते तर आज ही आघाडी उभी करण्याची गरज भासली नसती, असे सांगत ही आघाडी विशिष्ट जातीपुरती मर्यादित नाही, तर सत्तेपासून दूर असलेल्या घटकांसाठी आहे़ त्यामुळे मराठा समाजातील आर्थिक दुर्बलांनीही या आघाडीत सहभागी होवून लढा बुलंद करायला हवा़, असे ते म्हणाले़आज संघप्रणीत सरकारमुळे संविधान धोक्यात आले आहे़ मात्र देशातील बहुजनांच्या ताकदीचा अंदाज त्यांना नाही़ आम्ही संविधान वाचवू आणि त्यासोबत सत्तेतील हक्काचा वाटाही वंचितांना मिळवून देवू असे ते म्हणाले़ अॅड़ आंबेडकर यांनी यावेळी भाजपा सरकारवरही घणाघाती टीका केली़ शेजारी देश असलेल्या भूतान या छोट्याशा राष्ट्राने विकासाची संकल्पना बदलली आहे़ घर, शिक्षण, नोकरी याबरोबरच शांततेने जगणे म्हणजे विकास अशी व्याख्या त्यांनी केली आहे़ आपल्याकडे याच्या नेमकी उलट स्थिती आहे़ केवढ्या कोटीचा नफा झाला त्यावर विकासाचे मोजमाप केले जाते़ मात्र या नफ्यातील वंचितांच्या वाट्याला काय येते ? असा सवाल करीत सत्तेत बसलेल्या धर्मदांडग्यामुळे गरीब आणि श्रीमंतातील दरी आणखी रुंदावत चालल्याचे त्यांनी सांगितले़ काँग्रेसने घोषणेच्या निम्मी कामे करुन पैसे खाल्ले़ आता भाजपा तर अस्तित्वात नसलेल्या कारखान्यांना करोडोंची कर्जे देत आहे़ नुकतेच रिलायन्स कंपनीच्या जीओ या अस्तित्वात नसलेल्या विद्यापीठाला या सरकारने १ हजार कोटींचे अनुदान जाहीर केले आहे़ या विद्यापीठाची नोंद नाही, युजीसीकडे अर्ज नाही मग अनुदान कसे? आणि त्यावर काँग्रेससह इतर पक्ष गप्प का आहेत? असा प्रश्न करीत, हेच पक्ष आता आम्हाला तुम्ही यांच्यासोबत गेलातर भाजपला फायदा होईल, असे सांगत आहेत़ आम्ही वंचितांसाठी १२ जागांची मागणी केली आहे़ त्या देणार असाल तर तुमच्यासोबत अन्यथा राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार देवू, असेही अॅड़ आंबेडकर यांनी जाहीर केले़ येणाºया निवडणुकीतील लढाई मोठी आहे़ उमेदवाराची जात न पाहता त्याच्या पाठीशी आघाडी म्हणून उभे रहा, असे आवाहनही त्यांनी केले.---वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ११ जिल्ह्यांत मेळावे घेण्यात आले आहेत़ या मेळाव्यांना ओबीसीमधील छोट्या-मोठ्या जातींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे़ मुस्लिम समाजबांधवांनाही आम्ही आमची भूमिका समाजावून सांगत आहोत़ एकूणच वंचित समाज जागा होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ या एकजुटीच्या बळावरच आगामी निवडणुकांत आम्ही आमची ताकद दाखवून देवू.
- अॅड़ प्रकाश आंबेडकर