कासराळी - येथील ग्रा.पं. निवडणुकीत युवकांनी यंदा धुरा खांद्यावर घेत ठक्करवाड यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. सर्वच वाॅर्डांत तोडीसतोड उमेदवार दिल्याने कडवी झुंज येथे होत आहे.
बिलोली तालुक्यातील कासराळी येथील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे माजी आ. गंगाराम ठक्करवाड आणि विरोधक अशीच निवडणूक आजपर्यंत झाली. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत ठक्करवाड विरोधक आणि काँग्रेस समर्थकांना यश मिळाले. मात्र, ते सत्तेला पूरक नव्हते. ग्रामपंचायतीत ५-२, अशा दोन पंचवार्षिकमध्ये यश मिळाले. मात्र, सरपंच काही होता आले नाही. सत्ता ठक्करवाड यांच्याच ताब्यात राहिली. त्यावेळी माजी जि.प. सदस्य संग्राम हायगले, नरेंद्रसिंह ठाकूर, गंगाराम चरकुलवार, सेवानिवृत तलाठी दत्तात्रय गंदमवाड आदी मंडळी तत्कालीन ठक्करवाड विरोधक म्हणून ओळखली जायची. मात्र, अपेक्षित यशाअभावी ही मंडळी आज निवडणुकीपासून लांब असल्याने यंदाच्या निवडणुकीत मात्र ही बाजू युवकांनी सांभाळली आहे. येथे ठक्करवाड यांच्याविरोधात अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख, शिवा पाटील कासराळीकर, शिवा जाकापुरे, शिवाजी शिंदे, पं.स. सदस्य प्रतिनिधी हनमंत इंगळे, दीपक संदलोड, पप्पू फुलारी यांनी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एल.एच. लंके यांना सोबत घेत स्वतंत्र पॕॅनल उभे केले. प्रारंभी येथे ठक्करवाड गटाकडून अनेकांनी निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. मात्र, मर्जीतील लोकांना उमेदवारी मिळाल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. अनुसूचित जाती घटकातील इच्छुकांचे बंड पंचायत समिती तिकिटाच्या आमिषाने मोडीत निघाले. वास्तविक सध्या कासराळी पं.स. गणच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि चक्रानुक्रमे आरक्षण असल्याने २० वर्षांपर्यंत हे गण या प्रवर्गासाठी राखीव राहतील याची सुतराम शक्यता नसताना बंड करणाऱ्यांना या तिकिटाचे गाजर दाखविण्यात आले आहे. सध्या येथे प्रचाराने वेग घेतला असून, ठक्करवाड यांच्यासमोर तोडीसतोड उमेदवार दिले.