अर्धापूर (नांदेड ) : तालुक्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचा अंतिम टप्पा असून एमआर लसीकरणाबाबत पालकांचा विश्वास वाढला आहे. दरम्यान, लसीपासून वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या पालकांनी अफवेवर विश्वास न ठेवता लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने यांनी केले आहे.
तालुक्यातील मालेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत १० हजार ३६५ लाभार्थ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट असताना १० हजार ५९६ लाभार्थ्यांना लस देवून १०२ टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्धापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत १७ हजार २२९ लाभार्थ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट असताना १४ हजार ६९२ लाभार्थ्यांना लस देवून ८५ टक्के काम पूर्ण झाले. २ हजार ५३७ लाभार्थी वंचित राहिले असून ज्या भागात लसीकरणाचे काम कमी झाले त्या भागातील शाळांचे मुख्याध्यापक, मौलाना, प्रभावशाली व्यक्ती व पालक यांच्या बैठक घेऊन लाभार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आले.
प्रामुख्याने शहरात लसीकरणाबाबत वंचित लाभार्थ्यांची संख्या जास्त राहिल्याने त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. गोवर, रुबेला लसीकरणाला आता प्रतिसाद मिळत असून वंचित लाभार्थ्यांसाठी दररोज येथील युनानी दवाखान्यात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. लसीकरण मोहीम १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे.