अखेर मनपा विरोधी पक्षनेते पद दीपकसिंह रावतांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 08:14 PM2020-01-08T20:14:06+5:302020-01-08T20:15:09+5:30
भाजपाच्या अंतर्गत वादातून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता़
नांदेड :नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाच्या दीपकसिंह रावत यांची नियुक्ती करण्यात आली़ भाजपातील अंतर्गत वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अखेर महापौर दीक्षा धबाले यांनी निर्णय घेतला आहे़ भाजपा शहराध्यक्ष प्रवीण साले यांच्या उपस्थितीत रावत यांनी विरोधी पदाचा पदभार स्वीकारला आहे़
भाजपाच्या अंतर्गत वादातून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता़ सर्वाेच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्या आदेशानंतर महापौर दीक्षा धबाले यांनी सोमवारी भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले़ त्यात गुरूप्रीतकौर सोढी यांची अनुपस्थिती होती़ भाजपाच्या उपस्थित सर्वच नगरसेवकांनी विरोधी पक्षनेता म्हणून दीपकसिंह रावत यांना पसंती दिली होती़ महापौरांनी या सुनावणीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून रावत यांना मान्यता दिली़ याबाबतचे पत्र रावत यांना सुपूर्द केले़ महापौरांनी मान्यता दिल्यानंतर रावत यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला़ यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती होती़
निवडीवर भाजपामधून टीका
कॉंग्रेसने केलेल्या या निवडीबाबत भाजपा युवा मोर्चाचे दिलीपसिंघ सोढी यांनी टीका केली आहे़ गुरूप्रीतकौर सोढी यांच्या निवडीच्या ९ महिन्यानंतर भाजपाच्या रावत यांच्यासह इतर पाच नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले़ त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला़ त्यामुळे मतविभाजनातून काँग्रेसचा आमदार निवडून आला़ उच्च न्यायालयाने भाजपाच्या सहा जणांमधून एकाची निवड करण्याचे आदेश महापौरांना दिले होते़ त्यात रावत यांना काँग्रेसने संधी दिली आहे़ यातून काँग्रेसच्या विजयात वाटा उचलणाऱ्या रावत यांना संधी दिल्याची टीका सोढी यांनी केली़