नांदेड : थकीत सेवा करापोटी महापालिकेने दक्षिण मध्य रेल्वेचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई १४ मार्च रोजी केली होती. या कारवाईनंतर दक्षिण मध्य रेल्वेने थकीत मालमत्ता करापोटी दीड कोटी रुपये महापालिकेकडे १९ मार्च रोजी जमा केले आहेत.नांदेड महापालिका हद्दीतील दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड, माळटेकडी रेल्वेस्टेशन तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाला मनपा विविध सोयी-सुविधा पुरविते. या सेवा करापोटी महापालिकेच्या दक्षिण मध्य रेल्वेकडे ९ कोटी ३२ लाख रुपये थकीत होते. वारंवार मागणी करुनही सेवा कराची रक्कम भरली जात नव्हती. अखेर १४ मार्च रोजी आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचा पाणीपुरवठा खंडित केला होता. या कारवाईनंतर रेल्वे विभागाकडून सेवाकर भरण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.थकीत सेवा कराची संपूर्ण रक्कम भरण्याचे अधिकार सिकंदराबाद येथील रेल्वेच्या मुख्य कार्यालयाला आहेत.यामुळे सदर रक्कम भरण्याचा प्रस्ताव नांदेड विभागीय कार्यालयाने मुख्य कार्यालयाला सादर केला आहे. त्याचवेळी आपल्या अधिकारांतर्गत विभागीय कार्यालयाने दीड कोटी रुपये सेवा करापोटी महापालिकेला अदा केले आहेत.उर्वरित रक्कमही महापालिकेला लवकरच अदा करण्यात येईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाने कळवले असल्याचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी सांगितले.दरम्यान, सिडको झोनअंतर्गत ग्रामीण पॉलिटेक्नीक कॉलेजनेही आपल्याकडील थकीत मालमत्ता करापोटी ९ लाखांचा धनादेश महापालिकेला अदा केला आहे. उपायुक्त संधू यांच्या उपस्थितीत जप्ती अधिकारी डॉ. रईसोद्दीन शेख, सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, सदाशिव पतंगे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक हिराचंद भुरेवार, वसुली लिपिक दीपक पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
अखेर रेल्वेने भरले दीड कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:20 AM
थकीत सेवा करापोटी महापालिकेने दक्षिण मध्य रेल्वेचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई १४ मार्च रोजी केली होती. या कारवाईनंतर दक्षिण मध्य रेल्वेने थकीत मालमत्ता करापोटी दीड कोटी रुपये महापालिकेकडे १९ मार्च रोजी जमा केले आहेत.
ठळक मुद्देमहापालिका : दक्षिण मध्य रेल्वेकडे थकले सेवाकराचे ९ कोटी ३२ लाख