अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बदलते वातावरण आणि शहरातील अस्वच्छतेमुळे शहर व परिसराला डेंग्यू तसेच स्वाईन फ्ल्यूचा विळखा पडला असून शासकीय यंत्रणेकडे रुग्णांच्या नोंदी व प्रत्यक्षात उपचार घेणारे रुग्ण यांच्यात मोठी तफावत आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेच्या उपाययोजना अत्यंत तोकड्या आणि ठरावीक असल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने सर्दी, ताप यासह डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूची लक्षणे आढळताच शासकीय यंत्रणांना त्याबाबत माहिती द्यावी, असा दंडक असला तरी तो प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणला जात नसल्याचेही चित्र आहे. शहरातील खाजगी रुग्णालयावर महापालिकेचे नियंत्रण म्हणावे तितके नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.बदलते वातावरण आणि अस्वच्छतेचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहर हद्दीत जानेवारी २०१८ ते आजघडीपर्यंत १३१ रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. यात सर्वाधिक आॅगस्टमध्ये ४५ रक्तजल नमुने घेतले असून त्यात १८ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. त्यामुळे आॅगस्टमधील रुग्णांची संख्या पाहता डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने युद्धस्तरावर उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. शासकीय आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष खाजगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या तर कितीतरी पटीने अधिक आहे. सप्टेंबर मध्ये अशीच परिस्थिती आहे. शहरात सप्टेंबरमध्ये ९ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. २३ रक्तजल नमुन्यांपैकी ९ जणांना डेंग्यूची लागण ही बाबही अत्यंत चिंताजनक आहे.नांदेड शहरात फेब्रुवारी १८ मध्ये १, मेमध्ये २, जून-२, जुलैमध्ये सात जणांना डेंग्यू झाला होता. मागच्या वर्षीची संख्या पाहता संपूर्ण वर्षभरात २२३ रक्तजल नमुने घेण्यात आले होते, त्यातील ४९ जणांना डेंग्यू झाला होता. विशेष म्हणजे, आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत गतवर्षीही डेंग्यू रुग्णांची संख्या १२ होती. यावर्षीही आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या डासासाठी आॅगस्ट आणि सप्टेंबर हा कालावधी पोषक असतो. ही बाब आरोग्य विभागाला माहीत असतानाही या कालावधीत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. परिणामी डेंग्यूच्या संख्येत वाढच झाली आहे.याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात हिवताप आणि डेंग्यू आजाराबाबत उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले. तीन पथकांद्वारे दैनंदिन अळीनाशक फवारणी कार्यक्रम, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पीमासे सोडणे, खाजगी रुग्णालयांना दैनंदिन भेटी देवून डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांची माहिती घेणे, रक्तजल नमुने फेरतपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविणे, डेंग्यू दूषित रुग्णांच्या घरी, परिसरात धूर फवारणी, अळीनाशक फवारणी, कंटेनर सर्व्हे केला जात आहे.कंटेनर सर्व्हेदरम्यान साठवलेल्या पाण्यासाठी कुलरमधील पाणी रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचवेळी शहरात १ जुलैपासून शाळा, महाविद्यालयांमध्येही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कीटकजन्य आजाराबद्दल जनजागृती केली जात आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनीमार्फत घरोघरी कंटेनर सर्व्हे केला जात आहे. प्रत्येक दिवशी ५० स्वयंसेविकामार्फत मनपा कार्यक्षेत्रात अडीच हजार घरांना भेटी देवून कंटेनर तपासले जात आहे व ते रिकामे केले जात असल्याचे सांगण्यात आले. तपासणीसाठी येणाºयांपैकी ३० टक्क्यांहून अधिक रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न होत आहे़ या रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाणही जास्त आहे, अशी माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ़ राजेश माने यांनी दिली आहे़---सिडको, देगावचाळमध्ये आढळले रुग्णसिडको-हडकोसह देगावचाळ भागात डेंग्यूचे काही रुग्ण आढळले. उपचाराअंती ते बरे झाले. त्यामुळे या भागात धूरफवारणी, अळीनाशक फवारणी, कंटेनर सर्व्हे कार्यक्रम राबविण्यात आले. शहरात प्रत्येकी दिवशी ५० स्वयंसेविका मनपा कार्यक्षेत्रात अडीच हजार घरांना भेटी देवून कंटेनर तपासले जात आहेत व दूषित कंटेनर रिकामे केले जात आहेत. शहराची लोकसंख्या पाहता आरोग्य विभागातील कर्मचारीसंख्या निश्चित कमी आहे. मात्र उपलब्ध आरोग्य कर्मचाºयांवर सुविधा देण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता चव्हाण यांनी सांगितले.
डेंग्यू,स्वाईन फ्ल्यूचा नांदेडला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:35 AM
दुसरीकडे महापालिकेच्या उपाययोजना अत्यंत तोकड्या आणि ठरावीक असल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ठळक मुद्देअस्वच्छतेमुळे साथीचे आजार : शासकीय नोंदी आणि प्रत्यक्ष रुग्णसंख्येत तफावत