अर्धापूर (नांदेड ) : दाभड ग्रामपंचायतमध्ये २०११ ते २०१६ दरम्यान बंद खात्यातून वेळोवेळी मोठ्या रकमा उचलून सुमारे ३० लाख ६४ हजार ८२९ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशान्वये अर्धापूर पोलिसांनी तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
तत्कालीन सरपंच शंकरराव केशवराव टेकाळे, ग्रामसेविका माधुरी रावण बाचेवाड, ग्रामसेवक उत्तम नागोराव देशमुख, प्रल्हाद रामराव जाधव, कर्मचारी प्रकाश व्यंकटराव दादजवार, सेवक भीमराव केशवराव टेकाळे अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी निकृष्ट दर्जाची बोगस विकासकामे करून ३० लाख ६४ हजार ८२९ रुपये शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली़ या प्रकरणी व्यंकटराव बापूराव टेकाळे यांनी न्यायालयात तक्रार नोंदविली होती. १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाचा निधी तत्कालीन सरपंच शंकरराव टेकाळे यांनी ग्रामपंचायत बँक खात्यातून ३ लाख ४७ हजार २०० रुपये उचलून निकृष्ट दर्जाची कामे गुत्तेदाराच्या स्वरुपात स्वत:च केल्याचा आरोप आहे.
विकासकामाच्या नावाखाली पैसे उचललेतत्कालीन ग्रामसेविका माधुरी बाचेवाड यांनी ११ लाख ६२ हजार ६२९ रुपये उचलून विकासकामे न करता अपहार केला़ तत्कालीन ग्रामसेवक उत्तम देशमुख यांनी विकासकामाच्या नावाखाली ९ लाख ९३ हजार रुपये उचलले़ तत्कालीन ग्रामसेवक प्रल्हाद जाधव यांनी ३८ हजार उचलून कोणतेही काम केले नाही़ ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रकाश दादजवार यांनी ३ लाख २० हजार रुपये उचलले़ सेवक भीमराव टेकाळे यांनी २ लाख ४ हजार रुपये बँकेतून स्वत:च्या नावावर उचलले़ अशाप्रकारे सर्वांनी मिळून एकूण ३० लाख ६४ हजार ८२९ रुपये बँक खात्यातून उचलून अपहार केल्याप्रकरणी व्यंकटराव टेकाळे यांनी २७ जुलै २०१७ रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात अर्ज दिला़ पण या प्रकरणात पोलीस ठाण्याने कारवाई न केल्याने व्यंकटराव टेकाळे यांनी न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने अर्धापूर पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदवण्यास सांगितले़ शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना स्वत:च्या नावे बँक खात्यातून रक्कम उचलता येत नाही.
अनियमितता आहे, अपहार नव्हेयाप्रकरणी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व सेवकाविरूद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास फौजदार गणेश गायके हे करीत आहेत़ तालुक्यात काही दिवसांपूर्वी घर मालमत्ता प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने कामठा बु़ सरपंच/ग्रामसेवकाविरूद्ध गुन्हा नोंद झाल्याची घटना घडली असता परत दाभड ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच/ग्रामसेवक, कर्मचार्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे़ दाभड ग्रामपंचायत प्रकरणात पंचायत समितीने केलेल्या चौकशीत केलेल्या कामात अनियमितता आहे पण अपहार नसल्याचे विस्तार अधिकारी (पंचायत) कैलास गायकवाड यांनी सांगितले़