लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/ मारतळा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़मारतळा येथे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने खाक झाल्याची घटना घडली़ त्यात बी-बियाणे, औषधी, स्टील भांडी, प्लास्टिक टाक्या व साहित्य, पादत्राणे, स्वीट हाऊस व रसवंतीगृहातील फर्निचर जळून लाखोंचे नुकसान झाले़ आग विझविण्यासाठी नांदेड येथून दोन अग्निशमन बंब बोलाविण्यात आले होते़ यावेळी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत तीन तासानंतर आग आटोक्यात आणली़ कापसी रोडलगत असलेल्या मार्केटमधील बसवेश्वर पंढरी आडकिणे भूकमारीकर यांच्या भांडी स्टोअरला शॉर्टसर्किटने आग लागली होती़ त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण करत नजीकची पाच दुकाने आपल्या कवेत घेतली़त्यात रवी अंबादास देशमुख उमाटवाडीकर यांचे रसवंतीगृह, मारुती भीमराव मुंके यांचे बी-बियाणे, औषधी दुकान, राज पुरोहित यांचे आंबे स्वीट हाऊस आणि भास्कर व्यंकटी ढगे वजीरगावकर यांचे एस़ के़ फुटवेअर यांच्या दुकानांचा समावेश आहे़ यावेळी गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता़ ग्रामस्थ व उस्माननगर पोलिसांनी प्रयत्न करीत दोन बंबाद्वारे मध्यरात्री दीड वाजता आग आटोक्यात आणली़ मात्र या आगीत पाच दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते़मारतळा येथे अग्निशमनचे अधिकारी आग विझवत असताना नांदेड शहरात मध्यरात्री एक वाजता राजेशनगर येथील शेतकरी चौकात (एम़एच़२६, एडी़३३९०) या क्रमांकाच्या अॅपे आॅटोला आग लागली़ दिलीप तुळसे यांचा हा अॅपे होता़ अग्निशमच्या जवानांनी लगेच ही आटोक्यात आणली़ तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता खुदबईनगर येथे चुना भट्टीजवळ डीपीच्या शेजारी असलेल्या घराला आग लागली होती़ आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला़ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कापूस संशोधन केंद्राजवळ संरक्षक भिंतीच्या ठिकाणी आग लागली होती़ या ठिकाणी वाळलेले गवत व इतर भंगारचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते़ आग वेळीच शमविल्यामुळे शेजारील एसक़े़टायर व इतर गॅरेजपर्यंत पोहचू शकली नाही़दरम्यान, शुक्रवार रात्र अन् शनिवारी अशा सलग आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़ सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही़
नांदेड जिल्ह्यात आगीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:23 AM
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़
ठळक मुद्देमारतळ्यात पाच दुकाने खाक : नांदेडमध्येही तीन ठिकाणी आग