येत्या २३ एप्रिलपासून बारावी व २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यापूर्वीच बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीटही उपलब्ध करून दिले जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांना एक तास आधीच केंद्रावर यावे लागणार आहे. मात्र भर उन्हात भरदुपारी पेपर सोडविताना जीवाची काहिली होणार आहे. एप्रिल, मेमध्ये जिल्ह्यात कडक उन्हाळा असतो. दुपारी तापमानाचा पारा ४३ अंशांपेक्षाही वर असतो. अनेक परीक्षा केंद्रांवर असुविधा आहेत. काही ठिकाणी पत्राच्या खोल्या असून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थाही नाही. अशा गैरसोयीच्या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर व गुणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेपरची वेळ बदलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजताची करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट- ऑनलाईन अभ्यसाक्रम शिकविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान हाेऊ शकले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्णपणे समजला नाही. त्यातच आता कोरोनाचे संकट भयंकर असताना एप्रिल व मे महिन्यातच परीक्षा घेण्यात येत आहेत. कोरोनाची दहशत व उन्हाचा सामना करत विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा घेतली जात आहे. एकतर परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजता करावी. - शिवराज इंगळे, विद्यार्थी
चौकट- विद्यार्थ्यांना वर्षभर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दहावी, बारावीचे वर्ष असतानाही त्यांना अभ्यासक्रम पूर्णपणे शिकविण्यात आला नाही. आता अभ्यास न होताच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. - अशोक जाधव, पालक