- शिवराज बिचेवार
नांदेड : लूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी शहरात दोन ठिकाणी गोळीबार गेला. ऐन निवडणुकीच्या काळात या घटना घडल्या. यात अहमदपूर येथील तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी आरोपींनी पळविलेल्या गाडीनेच मारेकरी जाळ्यात अडकले. कारमधील जीपीएसमुळे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला. बारा तासाहून अधिक काळ जंगलात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या. सुरेंद्रसिंग ऊर्फ सुरज जगतसिंघ गाडीवाले आणि शुभम राजकुमार कुलगुडे अशी त्या आरोपींची नावे आहेत़
८ एप्रिलच्या रात्री अहमदपूर येथील शेख नजीब अब्दुल गफार यांची (एम़एच़२४, एएस ८४४७) कार अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या़ यात शेख नजीब यांचा जागीच मृत्यू झाला होता़ त्यानंतर आरोपी ही कार घेऊन पसार झाले़ तत्पूर्वी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी डॉ़सतीश गायकवाड कुटुंबियांना अशाच पद्धतीने अडवून गोळीबार केला. परंतु सुदैवाने गायकवाड कुटुंबिय बचावले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेला आरोपींचा शोधार्थ पाठविले़ सर्वप्रथम मयताची ओळख पटविण्यात आली़ मयताचा भावाने दिलेल्या माहितीवरुन, आरोपींनी नेलेल्या कारमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी जीपीएसवरुन कार ट्रॅक करण्यास सुरुवात केली़ सुरुवातीचे काही तास ही कार बंदच होती़ त्यानंतर ती सुरु करुन आरोपी शंखतीर्थ परिसरात गेले़ ही माहिती जीपीएसवरुन सपोनि विनोद दिघोरे व त्यांच्या पथकाला मिळाली़ स्थागुशाचे हे पथक लगेच शंखतीर्थकडे रवाना झाले़ तोपर्यंत पहाट झाली होती़ आरोपी शंखतीर्थ परिसरात जंगलाच्या शेजारी कार पार्क करुन निघून गेले होते़ पण, पोलिसांनी संयम पाळत जंगलातच थांबण्याचा निर्णय घेतला़ आळीपाळीने तीन कर्मचारी जंगलात थांबून आरोपींची वाट पाहत होते़
...अन् दोन्ही आरोपी सापडलेपोलिस लक्ष ठेवून असताना जंगलातील कार नेण्यासाठी आरोपीचा भाऊ आला अन् तेथेच घात झाला़ पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले़ त्याच्या माहितीवरुन आरोपीच्या पल्सर या दुचाकीचा क्रमांक मिळविला़ ही दुचाकी जगतसिंघ गाडीवाले याच्या नावावर असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारुन त्याच्या मुसक्या आवळल्या़ तत्पूर्वीच शुभम कुलगुडे याला अटक केली होती़ एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली होती़ परंतु ४८ तासांच्या आत तपास करीत पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या़
पोलीस अधीक्षकांचा पाठपुरावा आरोपी जीपीएस यंत्रणा असलेली कार घेऊन पसार झाल्याचे कळताच पोलीस अधीक्षकांनी सर्व यंत्रणांना कामाला लावले़ खबऱ्यांना अलर्ट देण्यात आला़ जीपीएस किती वेळा बंद झाले अन् ती कार कोणत्या दिशेला जात आहे, याबाबत स्थागुशाच्या पथकाला सूचना देत होते़ शंखतीर्थला कार सुरु होईपर्यंत पथकातील कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतही ते सांगत होते़