नांदेड : काँग्रेस कार्यकर्ते तथा मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद कोकुलवार यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला अद्याप गती आली नसून या घटनेचे धागेदोरे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखले जाणारे गोविंद कोकुलवार हे शनिवारी सायंकाळी आपल्या कार्यालयात आले होते. गाडीतून खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात कोकुलवार हे गंभीर जखमी झाले. कोकुलवार यांना प्रारंभी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे तातडीने हलविण्यात आले. कोकुलवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. त्याचवेळी काही पथके शहराबाहेरही रवाना करण्यात आली आहेत. मात्र, या तपासात म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.कोकुलवार यांचा फायनान्सचा व्यवसाय असून अनेक आर्थिक बाबींशी ते निगडित आहेत. याच सर्व प्रकारातून घटना घडली काय? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत तर दुसरीकडे खंडणीचा प्रकार आहे काय? याबाबतही सूत्रे हलविली जात आहेत. पोलिसांना आतापर्यंत कोकुलवार यांनी एकही तक्रार अथवा धमकीबाबत माहिती दिली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.