नांदेड- बचत गटाच्या बैठकीनंतर आपल्या कार्यालयाकडे परत जात असलेल्या एका युवकावर गोळीबार करुन त्याच्याकडील ५७ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी शहरातील मिल्लतनगर भागात घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे नांदेड पुन्हा हादरले आहे.
रोहित गुगले हे क्रेडीट ॲक्सीस ग्रामील लि. मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. सकाळी आठ वाजता बचत गटाच्या बैठकीसाठी ते गेले होते. तेथून बचत गटाचे ५७ हजार रुपये घेवून दुचाकीवरुन ते परत कार्यालयाकडे येत होते. मिल्लतनगर भागात त्यांची दुचाकी आलेली असताना पाठीमागून दुचाकीवर दोघे जण तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गुगले यांच्या दुचाकीसमोर दुचाकी लावून अडविले. दुचाकीची चावी काढून घेत भिंतीवर देशी कट्यातून गोळी झाडली. त्यानंतर रोहित यांच्याकडील ५७ हजार रुपये काढून घेतले.
काही मिनिटातच आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे, उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोनि.द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या परिसरातील सीसी टिव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, नांदेड शहरात लुटीसाठी गोळीबार होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.