- अविनाश चमकुरे नांदेड : देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नागरी सेवेत पदार्पण करत शहरातील एका लाँड्रीचालकाच्या मुलाने इतिहास घडवला आहे. परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यासाला प्राधान्य देत प्रारंभी एमबीबीएस करून वैद्यकीय अधिकारी व त्यानंतर यूपीएसीच्या माध्यमातून यश संपादन करून समाजाची सेवा करण्याचा वसा घेऊन वाटचाल करणार असल्याची प्रतिक्रिया यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेले डॉ. शिवराज राजेश गंगावळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. डॉ. शिवराज गंगावळ यांनी देशभरात ७८८ वी रॅंक पटकवली आहे.
भारतीय नागरिक सेवा अर्थात यूपीएससी या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरची एकमेव प्रदूषणमुक्त परीक्षा म्हणून यूपीएससी परीक्षेकडे पाहिले जाते. या परीक्षेत नांदेड शहरातील होळीवरील रहिवाशी तथा प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार यांचे जावई डॉ. शिवराज राजेश गंगावळ यांनी अथक परिश्रमातून यश मिळवले आहे. डॉ. शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शिवराज गंगावळ यांच्या वडिलांनी लाँड्री व्यवसाय करत अथक परिश्रमातून शिवराज यांचे शिक्षण पूर्ण केले. दुसरा मुलगा राजस्थान येथे एमबीए करत असून मुलगीही डॉक्टर झाली आहे.
शिवराज यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण प्रतिभानिकेतन हायस्कूल, बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून, तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमबीबीएसनंतर शासकीय नोकरी स्वीकारली असली तरी पूर्वीपासून आपले ध्येय यूपीएससी होती. हा प्रवास सोपा नव्हता. सलग चार वेळा या परीक्षेत अपयश आले. पाचव्या प्रयत्नात मुख्य परीक्षेसह मौखिकपर्यंत मजल मारली; परंतु यश काही आले नाही. सहाव्यांदा पुन्हा जोमाने तयारी करून यश मिळविले. यूपीएससी ही मॅरेथॉन असून विजय मिळेपर्यंत संपूर्ण ताकदीनीशी तयारी केली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.