शेख इलियास।बिलोली : आग लागल्यास किंवा इमारत ढासळल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच कर्मचा-यांवर प्राथमिक उपचार तात्काळ व्हावा, या हेतूने शाळांमध्ये अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी आवश्यक असल्याचे निर्देश शासनाने दिले. मात्र, शासनाचे निर्देश धाब्यावर बसविले जात असल्याचे अनेक शाळांमध्ये निदर्शनास येत आहे. ज्या शाळांमध्ये अग्निशमन यंत्र आहेत, ते धूळखात आहेत.शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० रोजी राज्यातील सर्व शाळांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र प्रथम उपचारपेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याचप्रमाणे शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास प्रतिबंध घातला होता. आदेशाला आठ वर्षांचा कालावधी लोटला. बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील शाळांमध्ये अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटीचा पत्ताच नाही.काही शाळांमध्ये या यंत्राची व्यवस्था केली गेली होती. मात्र ती धूळखात आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या अनास्थेमुळे शासनाच्या निदेर्शाची अवहेलना होत आहे. गंभीर बाब म्हणजे, जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शाळांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.बिलोली तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक शाळांमध्ये हा प्रकार पहावयास मिळत आहे, मात्र अनेक शाळांतील मुख्याध्यापकांनी या यंत्राकडे पाठ फिरवून शाळेत ही व्यवस्था करून घेण्यास बगल दिल्याची स्थिती आहे. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्वमाध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर ही व्यवस्था असायला पाहिजे. मात्र याचे पालन कुठेही झाले नाही. तालुक्यात शेकडोंच्या घरात शाळा असून यात शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळांचा समावेश आहे. काही शाळांमध्ये आगीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा करण्यात आली नाही, अशी स्थिती प्रथमोपचार पेटीचीही आहे.शासनाच्या आदेशाची शाळा, प्रशासनाद्वारे उपेक्षा केली जात आहे, असे असताना शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई शाळा प्रशासनावर केली नाही. त्यामुळे विद्यार्जनाचे धडे गिरविणा-याा विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर आहे. जिल्हा प्रशासनाने बिलोली तालुक्यातील शाळांची चौकशी करून संबंधित शाळांना अग्निशमन यंत्र प्रथमोपचार पेटीची व्यवस्था उपलब्ध करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी पालकवगार्तून केली जात आहे.
बिलोली तालुक्यातील अनेक शाळा अतिदुर्गम व जंगलव्याप्त भागात असल्याने त्यांच्यापर्यंत प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी पोहोचू शकत नसल्याचे सदर भागातील शाळेच्या शिक्षकांकडून शासनाच्या अनेक नियमांना तिलांजली दिली जात असल्याची चर्चा आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सदर यंत्राची आवश्यकता आहे. यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी विनंती ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
- काही शाळांमध्ये या यंत्राची व्यवस्था केली गेली होती. मात्र ती धूळखात आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या अनास्थेमुळे शासनाच्या निदेर्शाची अवहेलना होत आहे. गंभीर बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून शाळावर कोणतीही कारवाई होत नाही.
- अनेक शाळा अतिदुर्गम व जंगलव्याप्त भागात असल्याने त्यांच्यापर्यंत प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी पोहोचू शकत नसल्याचे शाळेच्या शिक्षकांकडून नियमांना तिलांजली दिली जात आहे.
- आठ वर्षे उलटूनही बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील शाळांमध्ये अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटीचा अभाव आहे.